विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण : विद्यार्थ्यांचा गौरव, स्मरण्का प्रकाशन
प्रतिनिधी /म्हापसा
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे आयोजित न केलेला नामदेव शिंपी समाज गोव्याचा वार्षिक स्नेह-मेळावा यावर्षी नुकताच आझाद भवन, पर्वरी येथे बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पुहणे म्हणून अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्लीचे विश्वस्त बाळासाहेब आंबेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सम्राज्ञी कुबडे यांच्या स्वागत गीत व प्रस्तावनेने झाली. बाळासाहेब आंबेकर यांच्याहस्ते संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निमंत्रितांचा परिचय सम्राज्ञी कुबडे यांनी करून दिला. स्मरणिकेच्या प्रकाशनानंतर सचिव सुधीर कुबडे यांनी अहवाल वाचन केले. प्रमुख अतिथींच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वर्गवासी झालेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष नागेंद्र व्हावळ यांच्याहस्ते प्रमुख पाहुणे आंबेकर यांचा शाल, श्रीफळ आणि गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
भारत घडविण्यात हातभार लावावा
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आंबेकर म्हणाले की, आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे आपल्या समाजातील तरुणांनी कुठलेही आक्षेपार्ह वर्तन न करता भ्रष्टाचार मुक्त भारत घडविण्यात हातभार लावावा. अध्यक्ष नागेंद्र व्हावळ यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या चांगल्या कामाचा लेखाजोखा सादर केला. फंड वाढविण्यासाठी सहकार्य केलेल्या शरद कुबडे व आनंद शंकरदास यांचे कौतुक केले. प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन श्रीमती विभावरी शंकरदास यांनी केले.
दुसऱया सत्राची सुरुवात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाने झाली. नवीन सदस्यांचा परिचय यावेळी करून घेण्यात आला. स्पर्धा विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिसवितरण करण्यात आले. यात चित्रकला स्पर्धेत लहान गट- प्रथम- श्रुती रेळेकर, द्वितीय-श्रेया भिंगे, तृतीय- निम्मी परमार, उत्तेजनार्थ हर्ष वायंगणकर. चित्रकला स्पर्धा मोठा गट प्रथम बक्षीस- संध्या काकडे, द्वितीय- श्रेया काकडे, तृतीय- साईराज रेळेकर, उत्तेजनार्थ- श्रीया हिरवे यांना प्राप्त झाले.
पाककला स्पर्धा प्रथम- ज्योती हिरवे, द्वितीय- सूमन भिंगे, तृतीय-पूजा काकडे. रांगोळी स्पर्धा प्रथमः सिद्धी कुबडे, द्वितीय- पूजा काकडे, तृतीय-सूमन भिंगे यांना प्राप्त झाली. या मेळाव्यात 5 वी ते 10 वी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
समाजाची नूतन कार्यकारिणी
यावेळी सर्वानुमते निवडण्यात आलेली नूतन कमिटी पुढील प्रमाणेः अध्यक्ष- सुधीर कुबडे, उपाध्यक्ष- योगेश हिरवे, रमेश भिंगे, सचिव-राजू हिरवे, उपसचिव- विष्णू उल्हास हिरवे, मिलींद रेळेकर. खजिनदार- विजयकुमार नाझरे, उपखजिनदार-नारायण कुबडे, सदस्य- निलेश हिरवे, दामोदर हंचोटी, प्रकाश रेणके, आनंद शंकरदास, अनिल शंकरदास, हेमंत रोनवाळ, सौ. गीता व्हावळ, सौ. मीनल नानीवाल यांची निवड करण्यात आली. यावर्षीचे महाप्रसाद पुरस्कर्ते विष्णू उल्हास हिरवे व सौ. आनंदी विष्णू हिरवे यांचा अतिथींच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि तुळशीहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राज्ञी कुबडे यांनी तर दुसऱया सत्राचे आभार प्रदर्शन विजयकुमार नाझरे यांनी केले. श्रीमती उल्का काकडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.