आमदार वेन्झी व्हिएगस यांच्याकडून आपत्कलीन व्यवस्थापन पथकासमवेत होडीने पाहणी
प्रतिनिधी /मडगाव
बाणावली मतदारसंघातील सखल भागांतून जाणाऱया पश्चिम बगलरस्त्यावर स्टिल्ट पूल उभारण्याची मागणी बाणावलीवासीय करत आले आहेत. अन्यथा या भागांत पूरसदृश स्थिती उद्भवून नजीकच्या गावांतील रहिवाशांना त्याचा फटका बसविण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मागील दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे बाणावलीतील सखल भाग पाण्याखाली गेले असून स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांनी मंगळवारी आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला घेऊन होडीने तळेबांद, बाणावली येथील पूरसदृश भागाची पाहणी केली.
सरकारने स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील बगलरस्त्यावर स्टिल्ट पूल उभारण्याच्या मागणीची पूर्तता करावी, असे व्हिएगस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बाणावलीवासियांनी सदर रस्ता सखल भागांतून जात असल्याने येथील जमिनीत पावसाळ्यात पाणी भरून राहण्याची भीती व्यक्त केली होती. ती रास्त ठरली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपत्कालीन व्यवस्थापन पथकात जलस्रोत खात्यातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाण्याची पातळी जास्त असल्याचे त्यांनी मान्य केले.
आम्ही बाणावलीतील लहान मुलांना घेऊन काही महिन्यांपूर्वी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता व या भागातून जाणाऱया पश्चिम बगलरस्त्यावर स्टिल्ट पूल उभारावा अशी मागणी केली होती, असे मच्छीमार पेले यांनी सांगितले व सरकारने सध्याची स्थिती पाहून ही मागणी पूर्ण करावी, अशी मागणी केली. रस्त्याच्या मधोमध वाहिन्या टाकून पाणी एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठी वाट ठेवण्यात आली असली, तरी ही व्यवस्था तोकडी पडत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.