वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि रशियाचा संयुक्त संरक्षण उपक्रम ब्राह्मोस एअरोस्पेस हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करण्यास सक्षम आहे. भारत 5-6 वर्षांमध्ये पहिले हायपरसोनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्माण करण्यास यशस्वी होणार असल्याची माहिती ब्राह्मोस एअरोस्पेसने दिली आहे.
हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करण्यास आम्ही सक्षम आहोत असे उद्गार ब्राह्मोस एअरोस्पेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अतुल राणे यांनी काढले आहेत. ब्राह्मोस हे सर्वात शक्तिशाली आणि वेगवान क्रूज क्षेपणास्त्र आहे. 12 जून रोजी ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या पहिल्या स्वनातीत उड्डाणाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. 12 फेब्रुवारी 2023 रोजी ब्राह्मोस रेजिंग डेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
रशिया आणि भारत मिळून ब्राह्मोस-2 हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करत आहेत. यात स्क्रॅमजेट इंजिन बसविण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 600 किलोमीटर असणार आहे, जो वाढवून 1 हजार किलोमीटर करता येणार आहे. परंतु याचा वेग खूपच अधिक असणार आहे. मॅक-8 म्हणजेच 9800 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने शत्रूच्या दिशेने हे क्षेपणास्त्र झेपावणार आहे.
ब्राह्मोस-2 हायपरसोनिक क्षेपणास्त्र नौकाविरोधी, जमिनीवर हल्ला, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र असेल. युद्धनौका, लढाऊ विमान किंवा जमिनीवरील मोबाइल लाँचरद्वारेही ते डागता येणार आहे. हे क्षेपणास्त्र हवेत आपली दिशा बदलू शकते. लक्ष्याचा पाठलाग करत ते नष्ट करण्याची यामध्ये क्षमता असणार आहे.