ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचा 89.94 मीटर्सचा नवा राष्ट्रीय विक्रम,
स्टॉकहोम / वृत्तसंस्था
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीगमध्ये रौप्यपदकाची कमाई करत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. मात्र, त्याला 90 मीटर्स मार्कने अवघ्या 6 सेंटीमीटर्सने हुलकावणी दिली. एकापेक्षा एक स्टार ऍथलिट्सचा समावेश असलेल्या या इव्हेंटमध्ये ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स 90.31 मीटर्स थ्रोसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला तर जर्मनीच्या वेबरने 89.08 मीटर्स थ्रोसह कांस्यपदकाची कमाई केली.
24 वर्षीय नीरज चोप्राने गुरुवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या इव्हेंटमध्ये पहिल्याच प्रयत्नात 89.94 मीटर्सचा लक्षवेधी थ्रो केला आणि ही त्याची आजवरची देखील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या थ्रोच्या बळावरच नीरज रौप्यपदकावर शिक्कामोर्तब करण्यात यशस्वी ठरला.
पुढे, नीरजने 84.37 मीटर्स, 87.46 मीटर्स, 84.77 मीटर्स, 86.67 मीटर्स व 86.84 मीटर्स असे थ्रो नोंदवले. यादरम्यान त्याने आपलाच 89.30 मीटर्सचा मागील राष्ट्रीय विक्रम देखील मागे टाकला. नीरजने दि. 14 जून रोजी फिनलंडमध्ये संपन्न झालेल्या पाओ नूर्मी गेम्समध्ये देखील रौप्य मिळवले होते. तोच धडाका त्याने येथेही कायम राखला.
ग्रेनाडाच्या पीटर्सने या हंगामात दोनवेळा 90 मीटर्सपेक्षा अधिक थ्रो केले आहेत. त्याने गत महिन्यात दोहामधील डायमंड लीगमध्ये 93.07 मीटर्स तर नेदरलँड्समध्ये 90.75 मीटर्सचे विक्रमी थ्रो नोंदवले. येथे जर्मनीचा ज्युलियन वेबर पाचव्या फेरीत केलेल्या 89.08 मीटर्स थ्रोसह तिसरा आला. झेक प्रजासत्ताकचा टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यजेता जकूब व्हॅडलेजला (88.59 मीटर्स) चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. झेकचा आणखी एक ऍथलिट व टोकियो ऑलिम्पिक्स कांस्यजेता व्हेसेलीला 8 ऍथलिट्सच्या फायनलमध्ये सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याला 82.57 मीटर्सचा थ्रो नोंदवता आला.
दरम्यान, नीरज चोप्राने पीटर्सवर मात देण्याची एकाच महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. गुरुवारी चोप्राने आपल्या पहिल्याच जोरदार थ्रोमुळे नवा इतिहास रचण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. मात्र, नंतर पहिल्या प्रयत्नातील थ्रो सर्वोत्तम राहिल्याचे स्पष्ट झाले. आता अमेरिकेतील युगेन येथील दि. 15 ते 24 जुलैदरम्यान आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिप नीरजसाठी विशेष महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर 10 ऑगस्टला मोनॅको इव्हेंट होईल. मात्र, बर्मिंगहम राष्ट्रकुल दि. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होत असून यामुळे नीरज चोप्रा मोनॅकोत सहभागी होणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डायमंड लीगमधील पहिले 5 भालाफेकपटू
क्रमांक / ऍथलिट / संघ / थ्रो
1 / अँडरसन पीटर्स / ग्रेनाडा / 90.31
2 / नीरज चोप्रा / भारत / 89.94
3 / ज्युलियन वेबर / जर्मनी / 89.08
4 / जकूब व्हॅडलेज / झेक प्रजासत्ताक / 88.59
5 / ऑलिव्हर हेलँडर / फिनलंड / 85.46
कोट्स
मी 90 मीटर्सचा थ्रो याच वर्षात करु शकेन, याची मला खात्री वाटते. पण, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येच ते शक्य होईल, असे सांगता येणार नाही. किंबहुना, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मी फक्त यावरच अजिबात लक्ष केंद्रित करणार नाही. 90 मीटर्स थ्रोऐवजी सर्वोत्तम कामगिरी साकारण्यावर माझा फोकस असेल.
-ऑलिम्पिक सुवर्णजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा