सेन्सेक्समध्ये 567 अंकांची घट टायटन नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या दुसऱया दिवशी मंगळवारी शेअर बाजार हा घसरणीसहच बंद झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स 567 अंकांनी घसरणीत राहिला. टायटन आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 567 अंकांच्या म्हणजेच 1.02 टक्के घसरणीसह 55,107.34 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 153 अंकांनी अर्थात 0.92 टक्के घसरणीसह 16,416.35 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, रिलायन्स आणि पॉवरग्रीडचे समभाग तेजीत होते.
सेन्सेक्स आज सकाळी 302 अंकांच्या घसरणीसह 55,373 अंकांवर खुला झाला. सोबत निफ्टीही 99 अंकांच्या घसरणीसह 16,469 अंकांवर खुला झाला होता. दिवसभराच्या व्यवहारामध्ये सेन्सेक्सने 55,387 चा उच्चांकी स्तर आणि 54,882 चा नीच्चांकी स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले. निफ्टीमधील 10 क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसह तर एका क्षेत्राचे निर्देशांक तेजीत होते. रियल्टी क्षेत्राच्या निर्देशांकाने 1.67 टक्के घट दर्शविली. वित्तसेवा, एफएमसीजी, आयटी, माध्यम आणि फार्मा क्षेत्रांचे निर्देशांक 1 टक्के इतके घसरणीत होते. ऑटो समभागांमध्ये खरेदीचा व्यवहार होताना दिसला. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग घसरणीसह बंद झाले. हिंदुस्थान युनिलिव्हर, डॉ. रेड्डीज लॅब, एल अँड टी, बजाज फायनान्स आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.
दुसरीकडे जागतिक बाजारांचा विचार करता अमेरिकेतील बाजार तेजीत होते. तर युरोपियन बाजार मात्र घसरणीसह व्यवहार करत असल्याचे दिसून आले. आशियाई बाजारामध्ये निक्की 28 अंकांनी आणि शांघाय कम्पोझिट 5 अंकांनी वाढलेला होता. दुसरीकडे हँगसेंग आणि कोस्पी यांचे बाजार घसरणीत होते. सौदी अरबने विक्री किंमत वाढविल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून त्याचे पडसाद बाजारावर दिसले.