चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्स 215 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण बैठकीनंतर प्रभावीत होत बंद झाला आहे. यामध्ये आरबीआयने रेपोदरात जवळपास 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारात दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 214.85 अंकांनी घसरुन बंद झाला आहे.
दुसऱया बाजूला विदेशी संस्थाकडून गुंतवणूकदारांनी आपले भांडवल काढून घेतल्याने व कच्च्या तेलाच्या किमतीमधील तेजी यांचा नकारात्मक प्रभाव शेअर बाजारात राहिल्याचे दिसून आले आहे.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 214.85 अंकांनी म्हणजे 0.39 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 54,892.49 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 60.10 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 16,356.25 वर बंद झाला आहे.
बैठकीचा बाजारावर प्रभाव
आरबीआयच्या सहा सदस्यांच्या समितीने चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी बुधवारी 0.50 टक्क्यांची रेपोदरात वाढ केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांसह अन्य सर्वांना गृहकर्ज, वाहन आणि अन्य कर्जाचा मासिक हप्ता म्हणजे ईएमआय येत्या काळात वाढणार आहे. याचाच अर्थ सर्व प्रकारची कर्ज महाग होणार असल्याचे या रेपोदर वाढीने शिक्का मोर्तब केले आहे. याचा फटका मात्र बुधवारच्या शेअर बाजारातील सत्रात गुंतवणूकदारांना बसल्याने प्रमुख कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये बुधवारी भारती एअरटेल, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा यांचे समभाग प्रामुख्याने घसरणीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक, डॉ.रेड्डीज लॅब, बजाज फायनान्स, टीसीएस आणि टायटन यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत.
मुख्य घडामोडींपैकी आरबीआयने 2022-23साठी आर्थिक वृद्धीदर 7.2 टक्के आणि महागाईचा दर 6.7 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पतधोरण बैठकीमधून वास्तविक्ता स्पष्ट केली जात आहे. यातून महागाईवर आधारीत गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यताही आरबीआयेन मांडली आहे. यावर अर्थव्यवस्था मजबूत बनली असून पुन्हा नव्याने तेजी पकडत असल्याने बाजारातील कामगिरी उत्साहजनक राहणार असल्याचेही आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.
आशियातील अन्य बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग तेजीत राहिला असून दक्षिण कोरियाचा कॉस्पी नुकसानीसह बंद झाला आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.93 टक्क्यांनी वधारुन 121.69 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.