सेन्सेक्स निर्देशांकात 168 अंकांची घसरण ः बँकिंग, वित्त कंपन्या नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे भारतीय शेअरबाजार सोमवारी घसरणीसह बंद झाला होता. वित्त आणि बँकिंग क्षेत्रातील समभाग मोठय़ा प्रमाणात घसरणीत राहिले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 168 अंकांनी घसरत 60,092 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 61 अंकांनी घसरत 17,894 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 समभागांमध्ये तेजी आणि 15 समभागांमध्ये अर्थातच घसरण पाहायला मिळाली. निफ्टीमधील टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीत होते. तर अदानी एंटरप्रायझेस, ऍक्सिस बँक आणि हिंडाल्को यांचे समभागदेखील घसरणीत राहिले. महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, मारुती सुझुकी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभागही घसरणीसह बंद झाले. विप्रो आणि टीसीएस यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. धातू क्षेत्राचा निर्देशांक 1.32 टक्के आणि वित्तसेवा क्षेत्राचा निर्देशांक 0.76 टक्के घसरणीत होता. लिस्टेड कंपन्यांचे बाजारभांडवल मूल्य 58,033 कोटींनी घटून 280.68 लाख कोटींवर राहिले होते.
जागतिक बाजारात कल पाहता आशियाई बाजार सकारात्मकपणे कार्यरत होता. अमेरिकेतील बाजाराला मात्र सुट्टी होती. जपानचा निक्की 1 टक्का इतका घसरणीत होता. शांघाई कम्पोझिट मात्र 1 टक्का वाढीसह कार्यरत होता. युरोपियन बाजार सुरुवातीला तेजीसह खुले झाले होते. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील समभागांचा वाटा अधिक होता.
कच्च्या तेलाची मागणी जागतिक स्तरावर कमी झाल्यामुळे त्याचे बॅरेलमागचे दरही साधारण 0.75 टक्के इतके सोमवारी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया मात्र कमकुवत होताना दिसून आला.
इकडे सोन्याच्या किमतीत मात्र सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या माहितीप्रमाणे 16 जानेवारीला सराफी बाजारामध्ये सोने 352 रुपये वाढून 56,814 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीतही चांगली वाढ दिसून आली. सराफी बाजारामध्ये 1122 रुपयांनी महाग होत 69,236 रुपये प्रतिकिलो इतकी किंमत चांदीची झाली होती.