बाजारात गणेशोत्सवाचे साहित्य दाखल : खरेदीसाठी गर्दी , यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करणार
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव हळूहळू जवळ येत असल्याने गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. बाजारात गणेशोत्सवाचे साहित्य दाखल होत असल्याने बाजारपेठा साहित्यांनी बहरत आहेत. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीदेखील वर्दळ सुरू झाली आहे.
शहरातील गणपत गल्ली, पांगूळ गल्ली, मारुती गल्ली, मेणसे गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार आदी परिसरातील दुकाने गणेशोत्सवाच्या साहित्याने सजली आहेत. विशेषतः लायटिंग, प्लास्टिक माळा, सजावटीचे साहित्य, थर्मेकोलचे मखर यासह इतर साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांचीही रेलचेल दिसून येत आहे. याबरोबरच घरगुती गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, फटाके आदी खरेदी केली जात आहे.
बाप्पांच्या स्वागतासाठी भक्त सज्ज
पूजा साहित्याबरोबर गणरायाला प्रिय असलेले मोदक, मिठाई आणि इतर साहित्यही ठेवण्यात आले आहे. अवघ्या 13 दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे बाजारात गर्दी होवू लागली आहे. घरगुती गणेशमूर्ती ठरवून आगाऊ रक्कम दिली जात आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने नवीन वस्तूंची खरेदी अधिक होते. त्यामुळे नवीन कपडे खरेदीबरोबर टीव्ही, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणीदेखील वाढली आहे. यामध्ये विविध रंगांमध्ये विद्युत रोषणाईसाठी माळा ठेवल्या आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने बाप्पांच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत.