प्रतिनिधी/ सातारा
भाऊ व बहिणीचे अतुट नाते जपणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा, आज राखी पौर्णिमा असल्याने बाजारपेठेत मागील चार दिवसांपासुन खरेदी करीता गर्दी झाली होती. बुधवारी तर ही गर्दी अधिक प्रमाणात वाढली होती. रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधुन बहिणीकडुन भावाच्या हातावर राखी बांधली जाते. त्यामुळे या राख्या खरेदी करण्याकरीता ही मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.
विशेषतः लहान मुलांकरीता ही लाईटच्या, म्युझिकच्या, तसेच विविध कार्टुनची चित्रे असणाऱया विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चांदीच्या राख्यांची मागणी ही मोठय़ा प्रमाणात आहे. विविध किंमतींमध्ये या राख्यांची विक्री करण्यात येत आहे. तसेच परगावी असणाऱया आपल्या भावांकरीता अनेकांनी पोस्टाच्या माध्यमातुन राख्या पाठविल्या आहेत.
या सणानिमित्त भावाकडुन बहिणीला भेट ही देण्यात येते. त्यामुळे आपापल्या बहिणींना काहीतरी भेट स्वरूपात वस्तु द्यावी याकरीता शहरातील अनेक कपडय़ांच्या, सराफी दुकानांमध्ये ही एकच गर्दी पहावयास मिळत होती. अनेकांनी तर ऑनलाईनच्या माध्यमातुन आपापल्या बहिणींकरीता भेट मागविली आहे. त्यामुळे यंदाची राखी पौर्णिमा ही मोठय़ा उत्साहात साजरी होणार हे नक्की.
परिवहन मंडळातर्फे जादा बसेस
राखी पौर्णिमेनिमित्त प्रवासी संख्येत ही मोठय़ा प्रमाणात वाढ होते. याचीच दखल घेत परिवहन मंडळय़ाच्या वतीने बसेसच्या फेऱयांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये साताऱया जिल्हय़ातील सर्वच आगारामधुन जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. जेणे करून प्रवाश्यांना सोयीस्कर व्हावे.