बाप्पांचे स्वागत उत्साहात करण्यासाठी भक्तांची लगबग : पूजेच्या विविध साहित्याने बाजारपेठेला बहर
प्रतिनिधी / बेळगाव
गणेशोत्सवासाठी बाजारात विविध साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे बाजारपेठ पूजेच्या साहित्यानी बहरली आहे. बाप्पांच्या सजावटीला पूजेच्या साहित्याचे अधिक महत्त्व असल्याने या साहित्याला मागणी वाढली आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे बाप्पांचे स्वागत उत्साहात करण्यासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत वर्दळ वाढत आहे. त्यामुळे भक्तांबरोबर विविध साहित्यांनी बाजारपेठेला बहर येताना दिसत आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसे बाप्पांच्या स्वागतासाठी पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलत आहे.
गणेशोत्सवासाठी मागणी असल्याने पूजेच्या साहित्याने दुकाने सजली आहेत. विशेषतः कापूर, कंठी, लाल कपडा, रुमाल, अगरबत्ती, धूप, लाकडी पाट, समई, पितळेचे ताट, हळद-कुंकू, अबिर गुलाल, रांगोळी, नारळ आदी साहित्याला मागणी वाढली आहे.
दोन वर्षांच्या कोरोनानंतर पूजेच्या साहित्याची आवक वाढली आहे. कापूर 10 रुपयांपासून, लाल कपडा 10 रु., रुमाल 10 रु., अगरबत्ती-धूप 20 रु., समई वजनानुसार, वस्त्र 10 रु., कुंकू 20 रुपये डबी, रांगोळी 20 रुपये पाकीट, तांब्याचे ताट 250 रुपयांपासून, केळी झाडे 50 रु., केळीची पाने 10 रु., विडा सुपारी 480 रु. किलो, कापूस 10 रुपये पाकीट, खारीक 180 रु. किलो, हार 20 रुपये एक, फुले 20 रुपये, नारळ 20 रुपयांना एक, पाच फळे 50 रुपये असा पूजेच्या साहित्याचा दर आहे.
फळांच्या मागणीत वाढ
गणेशोत्सव काळात घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांसमोर पूजेचे आयोजन केले जाते. त्यामुळे पूजेच्या साहित्याबरोबर हार, फुले आणि इतर साहित्याची मागणी वाढत आहे. श्रावणमास आणि गोकुळाष्टमीसाठीही पूजेचे साहित्य आणि फळांची मागणी वाढली होती. आता गणेशोत्सव जवळ आल्याने पूजेच्या साहित्याबरोबर फळांची मागणी वाढली आहे.मोसंबी 60 ते 80 रु. किलो, सफरचंद 100 ते 140 रु. किलो, चिकू 120 रु. किलो, जवारी केळी 60 रु. किलो, सीताफळ 100 रु. किलो, पपई 30 ते 60 रुपये नग, डाळिंब 100 ते 150 रु. किलो असा दर आहे. श्रावणमासात फळांची विक्री समाधानकारक झाली. त्याबरोबर गणेशोत्सवासाठी शनिवारी आणि रविवारी मागणी वाढणार आहे, अशी माहिती फळ विपेत्यांनी दिली.
यंदा खरेदीला उधाण
गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या काळात विविध कार्यक्रम, गौरी पूजन, वसा पूजन आणि इतर पूजा केल्या जातात. त्यामुळे हार, फुले, फळे आणि पूजेच्या साहित्याची गरज असते. त्यामुळे पूजेच्या साहित्याला मागणी असते. यासाठी बाजारपेठेत पूजेचे साहित्य दाखल झाले आहे. मागील दोन वर्षात विपेत्यांना फटका बसला होता. मात्र, यंदा खरेदीला उधाण आल्याचे दिसत आहे. शिवाय पूजेच्या साहित्यामध्ये कापूर, कापूस, वस्त्र, सुपारी यांच्या किमती वाढल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत पूजेच्या साहित्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. पूजेचा बॉक्स 170 रुपये झाला आहे.
पूजा साहित्य मागणीत वाढ
मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पूजेच्या साहित्याची मागणी वाढली आहे. मात्र, काहींचे दर वाढले आहेत. कापसाचे उत्पादन कमी झाल्याने आवकही कमी झाली आहे. त्यामुळे वस्त्र आणि कापसाचे दर वाढले आहेत. विडा सुपारीही वाढली आहे. शनिवारपासून गणेशोत्सवासाठी पूजेच्या साहित्य खरेदीला गर्दी होईल.