सेन्सेक्स 303 तर निफ्टी 98 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय भांडवली बाजारातील सलगच्या तीन दिवसांच्या घसरणीला अखेर आठवडय़ातील अंतिम दिवशीच्या सत्रात पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये शुक्रवारी जागतिक पातळीवर मिळताजुळता कल राहिला होता. याचा फायदा हा भारतीय शेअर बाजाराला झाला असल्याचे दिसून आले. यामध्ये काहीसा मिळताजुळता कर राहिल्याने चढउताराचे चित्र निर्माण झाले होते.
प्रारंभीच्या दरम्यान शुक्रवारी भारतीय बाजारातील सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसोबत सुरु झाले होते. मात्र नंतर काहीवेळात बाजार स्थिरावल्याचे दिसून आले. दिवसअखेर सेन्सेक्स 303 अंकांनी वधारुन निर्देशांक 60,261.18 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 98.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,956.60 वर स्थिरावल्याची नोंद केली आहे.
प्रमुख क्षेत्रांमध्ये आयटी व धातू यांच्या कामगिरीमुळे बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त करण्यास मदत झाली. तसेच आशियाई बाजारात खरेदीची स्थिती निर्माण झाली होती. निफ्टीमधील एफएमसीजी आणि औषध यांचे निर्देशांक मात्र घसरणीसोबत बंद झाले.
उच्चांकावर पोहोचले सोने
शुक्रवारी सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी प्राप्त केली होती. इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वेबसाईटनुसार 13 जानेवारी रोजी सराफ बाजारामध्ये सोने 365 रुपयांनी महाग होत 56 हजार 462 रुपयावर पोहोचले होते. या अगोदर चालू महिन्यात 9 जानेवारी रोजी सोन्याचा दर सर्वात जास्त झाल्याची नोंद केली होती.
तिमाही अहवालावर नजर
आता भारतीय बाजारातील कंपन्यांच्या नफा कमाईचे तिमाही अहवाल सादर करण्यात येत आहेत. यानुसार शुक्रवारी आयटी कंपनी विप्रोने ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीचे आकडे सादर केले आहेत. यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा हा 2695 कोटी रुपयांनी वधारुन 3050 कोटी रुपयावर राहिला आहे.
आगामी काळात अन्य कंपन्यांही आपले तिमाहीचे आकडे सादर करणार असून याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागून राहणार आहेत. यामुळे बाजाराची आगामी वाटचाल ही या तिमाहीवर अवलंबून राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.