सेन्सेक्स 59 अंकांनी वधारला ः चढउताराचा प्रवास
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी बीएसई सेन्सेक्स 59 अंकांनी वधारला आहे. शेवटच्या सत्रात चढउतार राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक बाजारातील मजबूत संकेतामुळे सकारात्मक कल राहिला तर जगातील संस्थाकडून गुंतवणूकदारांनी लिलाव केल्याने बाजाराला समर्थन मिळाले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 59.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 58,833.87 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,558.90 वर बंद झाला आहे. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्सने काहीवेळ तब्बल 546.93 अंकांचा टप्पा गाठला होता.
सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, टायटन, पॉवरग्रिड कॉर्प, कोटक महिंद्रा बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, टाटा स्टील आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग प्रामुख्याने लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, एचडीएफसी, एशियन पेन्ट्स आणि भारती एअरटेल याचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक बाजारातील स्थिती पाहिल्यास यामध्ये आशियातील दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभात होते, तर चीनचा शांघाय कम्पोझिटचा निर्देशांक हा नुकसानीत राहिला आहे. यासह युरोपीयन प्रमुख बाजारात सुरुवातीला घसरणीचा कल राहिला होता.
शुक्रवारी फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख टिप्पणीच्या अगोदर गुंतवणूकदारांमधील विश्वास कमी झाल्याचे दिसून आले. यामुळे सतर्क राहून गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामध्ये महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह आपल्या पातळीवर व्याजदरात वाढीची योजना निश्चित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे याचाही परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.