होळी, धूलिवंदन चार-पाच दिवसांवर : बाजारात विविध रंग, मास्क, टिमकी आदी साहित्य दाखल : विविध वस्तूंच्या मागणीत वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
होळी, धूलिवंदन अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात विविध आकारातील पिचकाऱ्या, विविध रंग, मास्क आणि होळी सणासाठीचे इतर साहित्य दाखल झाले आहे. मागणीदेखील वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. विशेषत: विविध आकारातील पिचकाऱ्या बालचमूंना आकर्षित करू लागल्या आहेत.
होळीच्या सणासाठी गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, नारिंगी, पिवळा यासह नैसर्गिक रंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर पावडर कलरही उपलब्ध करण्यात आला आहे. पिचकारी 4 रुपयांपासून 1200 रुपयांपर्यंत, मास्क 3 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत, टिमकी 35 रुपये एक, प्लास्टिकचे ताशे 35 रुपये एक याबरोबरच साडी कलर, हर्बल कलर, गुलाल दाखल झाला आहे. साडी कलर 4 रुपये पाऊच, हर्बल कलर 90 रुपये आणि गुलाल 190 रुपये पाच किलो असा दर आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात होळी, धूलिवंदनवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा कोरोना संकटानंतर होळी उत्साहात साजरी होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे.
छोट्या भीम पिचकारीची क्रेझ
बाजारात विविध रंगांच्या आणि आकाराच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. बालचमूंना आकर्षित करतील अशा पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये छोट्या भीम पिचकारीची क्रेझ निर्माण झाली आहे. या पिचकारीला मागणी वाढू लागली आहे. याचबरोबर लहान आकारापासून ते 1200 रुपयांपर्यंतच्या मोठ्या पिचकाऱ्या उपलब्ध आहेत.
साहित्याने पांगुळ गल्ली बहरली
ग्रामीण भागामध्ये पावडर कलरचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे 15 ते 25 किलो पावडर बॅगची मागणी वाढत आहे. शहरातील पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, मेणसी गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार यासह इतर ठिकाणी होळीचे साहित्य दाखल झाले आहे. विशेषत: पांगुळ गल्ली होळीच्या साहित्याने बहरली आहे. विविध रंग, पिचकाऱ्या, मास्क आणि इतर साहित्याने दुकाने सजली आहेत.