Tarun Bharat

भगवंताच्या प्रसादावाचून वेदाचा अर्थ कळणार नाही

Advertisements

अध्याय विसावा

भगवंतांनी उद्धवाला सांगितले की, कुणाच्याही गुण दोषाकडे लक्ष देऊ नकोस म्हणजे तू ब्रह्मस्वरूप होशील भगवंतांच्या या सांगण्याचे उद्धवाला मोठे नवल वाटले. त्याला भगवंतांचे बोलणे वेद वचनांच्या अगदी विरुद्ध वाटले कारण त्याच्यामते भेदभाव, गुणदोष हे सगळं वेदांनीच प्रतिपादित केलेलं आहे मग त्याच्या विपरीत जाऊन भगवंत का बोलत आहेत? उद्धव त्याच्या मनात आलेली शंका भगवंतांना बोलून दाखवत आहे. तो म्हणाला, गुणदोषांच्या लक्षणांचा विस्तार तूच केला आहेस आणि त्यालाच मोक्षाचे साधन म्हंटले आहेस. मग त्या गुणदोषाकडे पाहू नकोस असे का म्हणतोस? तुझ्या अशा भाषणाच्या उलटसुलट प्रकाराने तुझ्या बोलण्यातच विरोधाभास उत्पन्न होतो. संसार पाहू गेले तर सगळा काल्पनिक आहे. त्यात एक स्वर्ग, एक नरक हा मोक्ष व हा बंध अशी वेदवचने सांगून लोकांना तूच भ्रमात पाडले आहेस. पूर्वी पुरुषाच्या मनात गुणदोषांचा गंधही नव्हता गुणदोषांमधील भेददृष्टी वेदवाणीमुळेच उत्पन्न झाली आहे. ते काम कुणा माणसाचे नव्हे आणि वेदांनीच भेददृष्टीचा निषेधही केला आहे यामुळेच माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे. तात्पर्य, अनेक गुणदोषांच्या दृष्टीची सृष्टि तुझ्या वेदानेच वाढविलेली आहे! एरवी पुरुषाच्या पोटात गुणदोषदृष्टि मुळीच नव्हती. खरोखर तुझ्या वेदाज्ञेनुसारच हे गुणदोष झालेले असल्यामुळे ते तू स्वतः जोरावारीने काढू म्हणशील तरी ते चित्तातून बाहेर निघावयाचे नाहीत! वेद हे अनादि असून प्रमाणभूत आहेत, हे तुझेच मुख्य वेदवचन आहे. यास्तव आता दोष व गुण पाहू नयेत हे तुझे विपरीत भाषण मान्य करवत नाही. गुणदोष हे प्रथम दाखवून दिलेस आणि आत्ता ते नको म्हणण्याचे कारण काय? हे नीटसे न कळल्यामुळे मन भ्रमात पडले आहे.

म्हणून हे कृपामूर्ते! कृपा करून हा भ्रम नाहीसा करून सोड. म्हणजे तुझ्या बोलण्यातला, मला वाटणारा विरोधाभास नष्ट होईल. हे उद्धवाचे भाषण श्रवण करून श्रीकृष्ण तीन योगांची उपपत्ती अर्थात अधिकारभेदाप्रमाणे वेदार्थाची प्राप्ती कशी कशी होते, हे  सांगू लागले.

मेघगर्जनेसारख्या गंभीर वाणीने श्रीभगवान् म्हणाले, माझ्या पूर्ण कृपेशिवाय माझी वेदवाणी कळत नाही. वेदशास्त्रार्थामध्ये निष्णात होऊन केवढेही ज्ञानी झाले तरी, माझ्या प्रसादावाचून माझ्या वेदाचा अर्थ मुळीच कळावयाचा नाही, हे लक्षात ठेव. ब्रह्मदेव चारही मुखाने वेद पढतो पण त्यालासुद्धा वेदार्थातील खरे रहस्य स्पष्टपणे समजत नाही, मग इतर बिचाऱयांची काय कथा?

ब्रह्मदेवाला जर वेदाचा अर्थ कळला असता, तर शंखासुराने वेद का नेले असते? ब्रह्मदेवाला वेदार्थातील मर्म समजले असते, तर तो सरस्वतीचा अभिलाष करता ना. आता खरोखर माझ्या वेदाचाही वेद्य निर्धार तुला मी सांगून देतो. उद्धवा, नीट लक्ष देऊन श्रवण कर. वेदाचा विचार असा आहे.

माझ्या वेदाला बहु बडबड करणे माहीत नाही. तो वायफळ कधीही बोलत नाही. ज्ञान, भक्ति आणि कर्म ही तीन कांडेच काय ती वेदाने सांगितलेली आहेत. माझ्या वेदाची जी वाणी आहे, ती ह्या तीन योगांचंच प्रतिपादन करते. म्हणून उद्धवा! मोक्ष मिळण्याला दुसरा मार्गच नाही हे पक्के लक्षात ठेव. तर ते तीन योग कोणते? त्यांच्या अधिकाराचे विभाग कसे केलेले आहेत? तेही तू विचारीत असशील तर सविस्तर सांगतो ऐक. जे कोणी खरोखरच अंतःकरणापासून ब्रह्मलोकीच्या भोगापर्यंत विरक्त असतात, जे कोणी विधिपूर्वक व संकल्पयुक्त संन्यास घेऊन कर्माचा त्याग करतात, अशा अधिकाऱयांकरिता मी ‘ज्ञानयोग’ प्रकट केला आहे. त्या आत्मज्ञानाच्या साधनाने माझी सायुज्यता म्हणजे मद्रूपता प्राप्त होते. आता ह्या लोकात जे केवळ अविरक्त असतात, विषयासाठी कामासक्त झालेले असतात, त्यांच्यासाठी मी कर्मयोग प्रगट केला आहे. ह्याप्रमाणे उच्च आणि नीच म्हणजे श्रे÷ व कनि÷ असे दोन्ही अधिकारी मी तुला सुस्पष्ट सांगितले आहेत.

क्रमशः

Related Stories

भंडारा अग्नितांडवाचा धडा

Patil_p

महाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ (21)

Patil_p

प्रसवे अनुदिनीं अष्टभार

Patil_p

फिरक्या आणि गिरक्या!

Patil_p

महिमा ड्रायव्हिंग सीटचा!

Patil_p

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p
error: Content is protected !!