कराराची माहिती सदर्न कमांडकडे पाठविण्याचा निर्णय : रुग्णालयात आवश्यक यंत्रोपकरणे उपलब्ध करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट कायद्याकडे दुर्लक्ष करून शाळेच्या आवारात टर्फ मैदान बनविण्यासाठी करार करण्यात आला आहे. सदर करार बेकायदेशीर असल्याने याबाबतची सविस्तर माहिती देण्याची सूचना सदर्न कमांड विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. त्यामुळे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच खासगी कंपनीसोबत करण्यात आलेल्या कराराची माहिती पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सर्वसाधारण बैठकीत टर्फ मैदानाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर टर्फ मैदानाचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर होता. शाळेच्या मैदानाची जागा टर्फ मैदान निर्माण करण्यासाठी विनामोबदला 25 वर्षांच्या कराराने देण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट कायदा 2006 मधील तरतुदीनुसार 25 वर्षांच्या कराराने कोणतीच जागा भाडेतत्त्वावर देता येत नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कायद्याचे उल्लंघन करून हा करार केला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर्न कमांडने कॅन्टोन्मेंट बोर्डला नोटीस बजावून कराराबाबतची माहिती सादर करण्याची सूचना केली होती. त्यामुळे याबाबत बैठकीत चर्चा करून कराराची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशातील विविध कॅन्टोन्मेंटच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे यामध्ये बेळगाव
कॅन्टोन्मेंटच्या सहभागाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यापूर्वी ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले असल्याचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बीफ मार्केट व पोर्क मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बीफ मार्केटच्या माध्यमातून वर्षाला 34 हजार रुपये भाडे मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
कॅन्टोन्मेंट रुग्णालयात अनेक रुग्ण औषधोपचारासाठी येत असतात. रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. येथील एक्सरे मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णालयात आवश्यक असलेली यंत्रोपकरणे उपलब्ध करून कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना सेवा पुरविण्यात यावी, अशी सूचना सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुप्पेकर यांनी बैठकीत केली. तसेच परिसरातील पथदीप बंद असल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना तुप्पेकर यांनी बैठकीत मांडली. सध्या
कॅन्टोन्मेंटचे पथदीप दुरुस्ती वाहन बंद असल्याने पथदीपांच्या दुरुस्तीचे काम थांबले आहे. पण भाडेतत्त्वावर दुसरे वाहन घेतले जाणार असून दुरुस्तीची कामे केली जातील, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी बैठकीला कार्यालयीन अधीक्षक एम. वाय. ताळुकर, अभियंते सतीश मन्नुरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.