वैमानिक सुखरूप, सरावाच्या वेळी दुर्घटना
प्रतिनिधी /वास्को
भारतीय नौदलाच्या मिग 29 के विमानाला पुन्हा एकदा अपघाताला सामोरे जावे लागले. बुधवारी सकाळी नियमित सरावाच्या वेळी हे लढाऊ विमान अरबी समुद्रात कोसळले. वैमानिक मात्र, या अपघातातून सुखरूप बचावला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान अपघातग्रस्त झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या घटनेच्या चौकशीचा आदेश नौदलाने तपास मंडळाला दिला आहे.
नौदल सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नौदलाच्या मिग 29 के विमानाने नियमित सरावासाठी दाबोळीच्या आयएनएस हंस हवाई तळावरून सकाळी साडे नऊच्या सुमारास उड्डाण केले होते. समुद्राच्या दिशेने झेपावलेल हे विमान तासाभराने सराव आटपून दाबोळीच्या धावपट्टीवर परत येताना दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातावेळी हे विमान समुद्री क्षेत्रातच होते. त्यामुळे विमान सरळ दक्षिण गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात कोसळले.
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आल्याने व विमान कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने वैमानिकाने ही माहिती आयएनएस हंस तळावरील हवाई नियंत्रण कक्षाला लगेच दिली आणि बचावासाठी मदतीचे आवाहन केले. त्यामुळे बचावासाठी हवाई तळावरून नौदलाच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. तोपर्यंत वैमानिकाने पॅराशुटच्या साहाय्याने विमानातून आपली सुटका करून घेण्यासाठी समुद्रात उडी घेतली.
अपघातग्रस्त विमानातील वैमानिक सुखरूप आहे. त्याला नौदलाच्या शोध पथकाने त्याचा समुद्रात शोध घेऊन त्याला सुखरूपरित्या हेलिकॉप्टरमध्ये उचलले.
तांत्रिक बिघाडाची निश्चित कारणे शोधण्यासाठी या घटनेची चौकशी होणार आहे. भारतीय नौदल स्वतंत्र तपास मंडळाकडून या अपघाताची चौकशी करणार आहे.
मिग 29 के विमानांच्या अपघातांच्या वाढत्या घटना
भारतीय नौदलाच्या मिग 29 के विमाने दुर्घटनाग्रस्त होण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. या घटना दाबोळीच्या धावपट्टीवर, नागरी परिसरात आणि समुद्रात घडलेल्या आहेत. चार वर्षांपूर्वी दाबोळी आयएनएस हंस हवाई तळावर मिग विमान उड्डाणाच्या प्रयत्नात असताना धावपट्टीच्या बाहेर भरकटत जाऊन पेट घेतला होता. वैमानिकाने मात्र या विमानातून बाहेर पडून जीव वाचावण्यात यश मिळवले होते. मिग विमानाला नोव्हेंबर 2016 मध्येही अपघात झाला होता. दोन वर्षांपूर्वी मिग विमान दुर्घटनेत वैमानिक निशांत सिंग याला मृत्यू आला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आणखी एका घटनेत मिग विमान वेर्णाच्या पठारावर कोसळले होते. त्यातून दोन वैमानिक सुखरूप बचावले होते. भारतीय नौदलाच्या मिग 29 के या अत्याधुनिक दर्जातील विमाने अपघातात सापडण्याच्या घटना वाढत आहेत. .भारतीय नौदलात दहा वर्षांपूर्वी समावून घेतलेली बहुचर्चित अशी ‘मिग 29 के’ अत्याधुनिक विमाने नौदलातील ब्लॅक पन्थर स्क्वॉड्रनकडून हाताळण्यात येतात. दाबोळीचा आयएनएस हवाई तळ या विमानांसाठी कायम तळ असून ही विमाने आयएनएस विक्रमादित्य जहाजावर तैनात असतात.