पुणे / प्रतिनिधी :
शाळा आणि क्रीडा हा विभाग एकत्र असायला हवा. राजकारणातील आघाडय़ांमुळे मंत्री वेगवेगळे होतात. पण, माझे गिरीश महाजन यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे एकत्र बैठक घेऊन काम करू. क्रीडा आणि शिक्षण खात्याने एकत्र काम केले पाहिजे. मंत्रीही एकच असायला हवा. भविष्यात असा निर्णय झाल्यास ते फायदेशीर ठरेल, असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृत महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण संचालक महेश पालकर, संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. स्वाती जोगळेकर, ऍड. अशोक पालांडे, मुख्याध्यापक सुनील शिवले आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : शाळांमध्ये आता तिसरीपासून परीक्षा
केसरकर म्हणाले, शालेय स्तरावर शिक्षण आणि क्रीडा हे दोन्ही विषय भविष्यात सोबत असतील. व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्यात येत आहे, ई-लर्निंग सुविधा राज्यातील प्रत्येक भागात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, नवे शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक साधने पुढील वर्षापर्यंत शाळेत उपलब्ध होतील. आधुनिक भारत घडविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देणे आणि त्यादृष्टीने पूरक शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षणात योगाभ्यास आणण्याचा विचार
योगसाधनेद्वारे स्मरणशक्ती वाढविण्यावर आणि मन एकाग्र करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांसाठी व्यायामाचे महत्त्व लक्षात घेऊन शारीरिक शिक्षणासाठी सुविधा देण्यासोबत शालेय जीवनात योगाभ्यास आणण्याबाबत विचार करण्यात येत आहे. आधुनिक तंत्र शिक्षणासोबत गायनासारख्या कलेचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता यावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून स्फूर्ती घ्यावी आणि आपले आयुष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले.