प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील चिवार सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात बाऊन्सरच्या मदतीने मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न करण्याचा ग्रामस्थांनी आज हाणून पाडला. तसेच कंपनीच्या कंत्राटदारास बाऊन्सरना तेथून हाकलून लावले. यापुढे असा प्रयत्न झाल्यास ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रात याआधीच चार ते पाच राष्ट्रीय कंपन्यांचे मोबाईल टॉवर आहेत. शिवाय या भागात अद्याप कुठल्याही प्रकारची नेटवर्किंग समस्या निर्माण झालेली नसताना देखील जुन्या सरकारी शाळेच्या आवारात बेकायदा मोबाईल टॉवर उभारण्याची गरजच नसल्याचे ग्रामस्थ तथा रिव्होल्युशनरी गोवन्सचे सत्यवान हरमलकर यांनी सांगितले. मात्र संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराकडून याआधीही दोनवेळा जबरदस्तीने टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला होता. परंतु स्थानिकांना अंधारात ठेवून कंत्राटदाराने बाऊन्सर व शाळेच्या शिक्षिकेच्या मदतीने मुख्य गेटचे कुलूप खोलून शाळेच्या आवारात टॉवरच्या कामास सुरुवात केली. ही वार्ता कळताच ग्रामस्थ खवळले व ते मोठय़ा संख्येने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी कंत्राटदारावर प्रश्नांचा भडिमार करून त्याला भंडावून सोडले. तसेच निर्वाणीचा इशारा देऊन त्याच्यासह भाडोत्री बाऊन्सरनाही हाकलून लावले. या प्रकारामुळे ग्रामस्थ आता सावध झाले आहेत. तसेच यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हणजूण-कायसूव सरपंच सावियो आल्मेदा म्हणाले की, चिवार येथील शाळेच्या आवारात खासगी कंपनीच्या कंत्राटदारास कुठल्याही प्रकारचा मोबाईल टॉवर उभारण्यास पंचायत मंडळाकडून कोणताच परवाना देण्यात आलेला नाही. शिवाय या भागात आणखी मोबाईल टॉवरची गरज नाही. पंचायत मंडळ ग्रामस्थांसमवेत आहे.