दररोज येऊन बसतोय वर्गात
झारखंडच्या हजारीबाग जिल्हय़ातील एका शाळेत माकड मुलांसोबत बसून शिक्षणाचे धडे गिरवत आहे. झारखंड-बिहार सीमेवर असलेल्या दनुआ विद्यालयात हा प्रकार घडतोय. या शाळेत मागील काही दिवसांपासून वर्गात दररोज एक माकड येऊन बसत आहे. इतर मुले काय शिकत आहेत याकडे या माकडाची बारीक नजर असते. माकडाच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक लोक या अजब घटनेने चकित झाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक रतन कुमार वर्मा यांनी याची माहिती दिली आहे.
या व्हिडिओत एक माकड दररोज शाळेत येत मुलांसोबत बसत असल्याचे दिसून येते. मुले शिकत असताना आणि शिक्षक शिकवत असताना हे माकड शांतपणे ऐकत असते. मुले वहीत काही लिहित असताना त्यांच्याकडे पाहत असते. शिक्षकांनी माकडाला वर्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीही ते तिथेच बसून राहते. मुले मैदानात खेळत असताना हे माकड त्यांच्यासोबत तेथे पोहोचते. सर्व मुले या माकडाच्या ओळखीची झाल्याने ते कुणालाच त्रास देत नाही.
मागील काही दिवसांपासून हे माकड नववीच्या वर्गात बसून शिक्षकांचे बोलणे ऐकत बसते. मुले आणि शिक्षकांनी पळवून लावण्याचा प्रयत्न केल्यास या माकडाला राग येत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे. मुख्याध्यापकांनी विद्यालयाच्या सुरक्षेसाठी वन विभागाला कारवाई करण्याची विनंती केली होती. वनविभागाच्या कर्मचाऱयांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु माकड त्यांच्या हाती लागले नाही. वन विभागाचे कर्मचारी तेथून निघून गेल्यावर माकड पुन्हा वर्गात जाऊन बसू लागले आहे.