एका किलोची किंमत आयफोनइतकी
जगभरात चहाप्रेमीप्रमाणेच कॉफीप्रेमींची संख्याही मोठी आहे. अनेक प्रकारच्या कॉफी प्रसिद्ध असून प्रत्येक ठिकाणच्या कॉफीची चव आणि किंमतही वेगवेगळी आहे. परंतु सर्वात महाग कॉफीबद्दल माहिती आहे का? ही कॉफी विकत घेण्याऐवजी तुम्ही एखादा नवा आयफोन करू शकाल. जगातील सर्वात महाग कॉफी एका पक्ष्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते.
जगातील सर्वात महाग कॉफी जाकू बर्ड कॉफी नावाने प्रसिद्ध आहे. ही कॉफी जाकू पक्ष्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते. जाकू बर्ड कॉफीची किंमत सुमारे 1 हजार डॉलर्स प्रतिकिलो इतकी आहे. म्हणजेच एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. ही सर्वात महागडी कॉफी ब्राझीलमध्ये तयार केली जाते आणि येथूनच याची जगभरात निर्यात होत असते.
जाकू बर्ड कॉफी तयार करण्यामागील कारणही विचित्र आहे. 2000 साली ब्राझीलच्या हेनरिक स्लोपर जी अराउजो या कॉफी बागायतदारोन या कॉफीची सुरुवात केली. त्यांच्या कॉफीच्या मळय़ात जाकू पक्ष्याने धुमाकूळ घातला होता. हे पक्षी त्यांच्या मळय़ातील कॉफीच्या बिया खायचे, यामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते.
जाकू पक्षी ब्राझीलमधील दुर्मीळ पक्षी आहे. याचमुळे त्यांना या पक्ष्याच्या त्रासापासून मुक्तता मिळवणे अवघड ठरले होते. या पक्ष्याला ईजा पोहोचल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येते. याचदरम्यान लुवाक कॉफी प्रचंड चर्चेत होती. ही कॉफी एक प्रकारच्या मांजराच्या विष्ठेपासून तयार केली जाते. अशा स्थितीत अराउजो यांना जाकू पक्ष्याच्या विष्ठेपासून कॉफी तयार करण्याची कल्पना सुचली. ही कॉफी चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या ही कॉफी जगातील सर्वात महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते.
कॉफी निर्मितीची पद्धत
ही कॉफी तयार करण्यासाठी आधी जाकू पक्ष्याची विष्ठा शोधतात आणि नंतर त्यामधून कॉफीच्या बिया वेगळय़ा केल्या जातात. या बिया स्वच्छ केल्यावर त्या नीट वाळविल्या जातात. कॉफीच्या बिया सुकल्यानंतर त्या भाजून त्यांची पावडर तयार केली जाते. हे संपूर्ण काम हातांनी केले जात असल्याने याची किंमत अधिक आहे.