Tarun Bharat

सर्वात उदार आणि दयाळू व्यक्तिमत्त्व !

संत तुकाराम महाराज एका अभंगात सर्वात उदार, दयाळू आणि सर्वाना अभय देणाऱया व्यक्तिमत्त्वाबद्दल गौरव करताना म्हणतात, तुज ऐसा कोणी न देखे उदार । अभयदान शूर पांडुरंग ।।1।। शरण येति त्यांचे न विचारिती दोष । मागता त्यास अढळ देसी ।।2।। धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारे देवा भक्ताचिया ।।3।। दोष त्यांचे जाळी कल्पकोटीवरी । नामासाठी हरी आपुलिया ।।4।। तुका म्हणे तुज वाणू कैशापरी । एकमुखी हरी आयुष्य थोडे ।।5।।अर्थात ‘हे पांडुरंगा, आपण अभयदान देण्यात फार श्रे÷ आहात आणि आपल्यासारखे उदार मला दुसरे कोणीही दिसत नाही. जे आपल्याला अनन्यभावाने शरण येतात, त्यांच्या दोषांचा विचार न करता आणि त्यांनी मागितले नसतानाही आपण त्यांना अढळपद देता. भक्त जेव्हा आपला हृदयपूर्वक धावा (स्मरण) करतात, तेव्हा आपण त्यांच्या रक्षणाकरिता संकटकाळी धावून येता. जे कोणी तुमच्या पवित्र नामाचा जप, कीर्तन करतात, त्यांचे जरी कोटय़वधी दोष असले तरी आपण त्यांचे दोष जाळून टाकता. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, आपल्या अनंत गुणांचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे, कारण मला एकच तोंड आहे आणि आयुष्यही कमी आहे.

पांडुरंग अर्थात भगवान श्रीकृष्ण हे सर्व सृष्टीमध्ये सर्वाना अभय देणारे आणि अंतःकरणाने उदार आहेत. ‘अभय’ म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे कोणत्याही भयापासून मुक्त आहेत, म्हणून सर्वार्थाने शरण गेलेल्या भक्तांनाही भगवंत सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त करतात. भागवतमध्ये कवी योगेंद्र निमिराजाला उपदेश करताना सांगतात (भा 11.2.37) भयं द्वितीयाभिनिवेशतः स्या-दीशादपेतस्य विपर्ययो।़स्मृतिः । तन्माययातो बुध आभजेत्तं भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा। अर्थात  भगवंताच्या बहिरंगा, मायाशक्तीमध्ये लिप्त झाल्यामुळे जीवात्मा चुकीने भौतिक शरीराशी तादात्म करतो, परिणामी त्याच्यात भय उत्पन्न होते. भगवंतापासून विन्मुख झालेला जीव ‘आपण भगवंताचे अंश आहोत, सेवक आहोत’ ही आपली मूळ स्थिती विसरतो. अशी अस्वाभाविक धारणा अर्थात आपल्या स्वभावाची विस्मृती भगवंताच्याच मायाशक्तीच्या प्रभावाने घडते. बुद्धिमान मनुष्याने स्वतःला भगवंताच्या विशुद्ध भक्तिमय सेवेत दृढपणे युक्त केले पाहिजे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार आणि त्याला आपले उपास्य दैवत तथा  प्राण समजून भक्ताने ही सेवा केली पाहिजे.’ या श्लोकांमध्ये आपल्याला समजते की, भय हे आपण जेव्हा भगवान श्रीकृष्ण जे आपले संरक्षण, पालन आणि रक्षण करतात हे विसरतो तेव्हा येते. प्रत्येकाला वास्तविक या जगामध्ये भय आहे ते त्याला प्रत्येक जन्मामध्ये सामोरे जाव्या लागणाऱया जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी याचे. पण या सर्वापासून भगवान आपले संरक्षण करू शकतात, अशा कठीण अवस्थेतून आपल्याला बाहेर काढू शकतात हे आपण विसरून गेलो आहोत. आपल्याला किंवा कितीही शक्तिमान, बुद्धिमान असलेल्या व्यक्तीला हे शक्मय नाही हे आपण जाणतो म्हणून आपण समजतो की कोणालाही ते शक्मय नाही. म्हणून या भौतिक जगात दुःखामध्ये तडफडणाऱया जीवांना भगवान श्रीकृष्ण अभय देत सांगत आहेत की (भ गी 12.6-7) ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः। अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम्। अर्थात ‘परंतु जे माझे पूजन करतात, ते आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्यभावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात आणि माझेच ध्यान करीत असतात, त्याचा, हे पार्थ! मी जन्ममृत्युरूपी संसारसागरातून त्वरित उद्धार करतो.’ म्हणून तुकाराम महाराज आपल्याला भगवान श्रीकृष्णांना अनन्यभावाने शरण जाण्यास सांगत आहेत.

 त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण उदार अंतःकरणाचे आहेत, त्यांच्याइतक्या उदार अंतःकरणाची व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. आपण जरी शत्रुत्वाने त्यांच्याशी वागलो तरी सर्व जीवांविषयी नेहमीच त्यांच्या हृदयामध्ये प्रेमभावना असते. या जगामध्ये लाखेंच्या संख्येने नास्तिक लोक आहेत, ज्यांचा भगवंताच्या अस्तित्वावर विश्वासही नाही, काही लोक भगवंतांना सदैव दोषही देत असतात पण आपल्या भक्तांप्रमाणे अशा नास्तिक लोकांची काळजीही भगवंतच घेत असतात. या जगात हवा, पाणी, अन्न आणि आसरा स्वतः भगवंतच सर्वाना पुरवितात. तिथे आस्तिक व नास्तिक असा भेद भगवंत करीत नाहीत. एवढेच काय भगवान श्रीकृष्णाविषयी वैरभावना ठेवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करणाऱया राक्षसांनासुद्धा त्यांनी क्षमा केली, इतकेच नाही तर त्यांना आपल्या आध्यात्मिक जगात उच्च स्थानही दिले. यासंबंधी उद्धव विदुराना सांगतात (भा 3.2.23) अहो बकी यं स्तनकालकूटं जिघांसयापाययदप्यसाध्वी । लेभे गतिं धात्र्युचितां ततो।़न्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम। अर्थात ‘अरेरे! अश्रद्ध असलेल्या आणि जहाल विषाचे स्तनपान करविणाऱया राक्षशीणीलाही धात्रीचे म्हणजे आईचे स्थान देणाऱया त्या भगवंतापेक्षा अधिक दयाळू कोण आहे, ज्याचा मी आश्रय घ्यावा?’. कंसाच्या आदेशानुसार पुतना राक्षसी ही स्तनाला विष लावून गोकुळामध्ये बाळकृष्णांना ठार मारण्याच्या दुष्ट हेतूने आली होती, पण बाळकृष्णाने तिचे विषही स्तनपान केले. ती वैरभावना बाळगून आली असली तरी तिचा आईचा दूध पाजण्याचा भाव स्वीकारून तिला आध्यात्मिक जगात दाईचे स्थान दिले. यावरून समजते की, भगवान श्रीकृष्ण किती दयाळू आणि उदार आहेत.

ध्रुव महाराजांनी आपला पिता उत्तानपाद यांच्या मांडीवर बसण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी त्यांची सावत्र आई सुरुचीने त्यांचा अपमान केला. त्यावेळी त्यांची सख्खी आई सुनीतीने ध्रुवाला वनात जाऊन श्रीविष्णूची आराधना करण्यास सांगितले. ध्रुव महाराज त्यावेळी केवळ सात वर्षांचे बालक होते. तरीही ते वनात निर्भीडपणे तपस्या करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची इच्छा भौतिक होती, पण नारदमुनींच्या कृपेमुळे त्यांना भगवान विष्णूंचे दर्शन झाले. प्रथम केवळ पित्याच्या मांडीवर बसणे एवढीच भौतिक इच्छा असलेल्या ध्रुव महाराजांना न मागता भगवंतांनी उत्तरध्रुव हे अढळपद दिले, सर्व ब्रह्मांडाचा नाश  झाला  तरी त्याचा नाश होत नाही. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये ज्यांनी आपणाला समर्पित केले आहे, त्यांना भगवंत वैकुंठाचे अविनाशी अढळपद देतात.

आपले निस्सीम भक्त पांडव यांचे संकटकाळी भगवान श्रीकृष्णांनी कसे रक्षण केले हे तर सर्वश्रुतच आहे. कुंती महाराणी जीवनामध्ये अनेक प्रकारचे त्रास सहन करूनही आदरपूर्वक भगवंतांना प्रार्थना करताना म्हणते (भा 1.8.24) विषान्महाग्नेःपुरुषाददर्शना-दसत्सभायावनवासकृच्छ्रतः। मृधे मृधे।़नेकमहारथास्त्रतो द्रौण्यस्त्रतश्चास्म हरे।़भिरक्षिताः । अर्थात ‘हे कृष्ण! तुम्ही आमचे विषयुक्त अन्नापासून, मोठय़ा अग्नीपासून, नरभक्षकांपासून, वनवासातील कष्टांपासून तसेच मोठमोठय़ा सेनानींच्या शस्त्रांपासून आणि दुष्टांच्या सभेत संरक्षक या नात्याने वेळोवेळी संरक्षण केले आहे आणि आता अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून तुम्ही आमचे रक्षण केले आहे.’ अशा प्रकारे पांडवांप्रमाणेच अनेक भक्तांचे रक्षण भगवंतांनी कसे केले याची अनेक उदाहरणे वेदिक ग्रंथामध्ये आहेत. त्याचप्रमाणे आपणही भगवान श्रीकृष्णांना निस्वार्थपणे शरण जाऊन या जीवनात त्यांच्या असीमित दयेचा, करुणेचा, अभयदानाचा, उदारपणाचा अनुभव घेऊ शकतो. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचे असे अनंत गुण आहेत त्यांचे वर्णन करण्यास आपल्या एका तोंडाने संपूर्ण आयुष्यही पुरणार नाही, कारण अनंतशेष आपल्या सहस्र मुखाने सनातन काळापर्यंत भगवंताचे पूर्ण गुणगान करू शकले नाहीत.

-वृंदावनदास

Related Stories

शिवरायांचा आठवावा प्रताप!

Patil_p

महागाईचा चटका

Patil_p

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे

Patil_p

पडद्यामागील ‘सूत्रधार’…

Patil_p

दहा रंगीत फुगे

Patil_p

पुनरपि जननं

Patil_p