द्वारावर जाताच होतो माणसाचा मृत्यू
जगात अनेक अजब ठिकाणे आहेत, यातील काही ठिकाणं अत्यंत रहस्यमय असून त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर प्रथमदर्शनी लोकांचा विश्वासच बसत नाही. या ठिकाणांबद्दल अनेक कहाण्या प्रचलित असतात. तुर्कियेमध्ये एक असे मंदिर आहे, जेथे गेलेला माणूस कधीच परतला नाही. या ठिकाणी अनेक लोकांचा रहस्यमय मृत्यू झाल्याने तेथे कुणालाच जाऊ दिले जात नाही.
हे रहस्यमय मंदिर तुर्कियेतील प्राचीन शहर हेरापॉलिसमध्ये आहे. या ठिकाणाबद्दल अधिक माहिती नाही, परंतु येथे राहणाऱया लोकांनुसार येथील मंदिराबाहेर एक दरवाजा असून त्याला नर्काचा दरवाजा म्हटले जाते. या दरवाजानजीक जाताच माणसाचा मृत्यू होत असतो. आश्चर्याची बाब म्हणजे या दरवाजानजीक केवळ माणसांचा नव्हे प्राण्यांचाही मृत्यू ओढवत असतो.
रहस्यमय मंदिराच्या दरवाजाला द गेट ऑफ हेल म्हणजेच नर्काचा दरवाजा म्हटले जाते. ग्रीक-रोमन काळादरम्यान या मंदिरात एक इसम राहत होता, ज्याचा शिरच्छेद करण्यात आला होता. या इसमाचा आत्मा अद्याप या मंदिरात भटकत असतो आणि हाच आत्मा येथे पोहोचणाऱया लोकांचा जीव घेत असतो, अशी वदंता स्थानिकांमध्ये आहे.
या मंदिरात ग्रीक देवतेचे वास्तव्य असल्याचेही स्थानिकांचे सांगणे आहे. या मंदिर परिसरात अनेक झरे असून त्यात स्नान केल्याने माणसांना अनेक रोगांपासून मुक्तता मिळत असल्याची कहाणी प्रचलित आहे.
तर वैज्ञानिकांचे मान्यतांपेक्षा वेगळे मत आहे. या मंदिराखाली कार्बन डायऑक्साइड समवेत अनेक विषारी वायू असून ते मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत असतात. या विषारी वायूंमुळेच येथे गेलेल्या लोकांचा मृत्यू ओढवत असतो. कुठल्याही मनुष्यासाठी 10 टक्के कार्बन डायऑक्साइड हानिकारक असतो. तर येथे या वायूचे प्रमाण 91 टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे माणूस आणि पशूपक्ष्यांचा श्वास कोंडून मृत्यू होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.