समुद्रसपाटीपासून 4,693 मीटरच्या उंचीवर, पवन अन् सौरऊर्जेने होतो संचालित
कधीकाळी लोकांचा पगार बँक खात्यांऐवजी थेट हातात रोख स्वरुपात दिला जात होता, मग वेतन थेट बँकेत जमा होऊ लागले, परंतु ही रक्कम काढण्यासाठी बँकेच्या फेऱया माराव्या लागायच्या. हळूहळू यावर उपाय म्हणून एटीएमचा वापर सुरू झाला. सद्यकाळात काही अंतरावर एटीएम स्थापन करण्यात येत असल्याने लोकांना मोठी सुविधा प्राप्त झाली आहे. एटीएम तुम्ही बाजारपेठेत किंवा नागरीवस्तीत पाहिले असेल, परंतु एक एटीएम उंच पर्वतावर असून तेथे वीजजोडणी पोहोचू शकत नाही. जगातील हा अनोखा एटीएम पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. पाकव्याप्त काश्मीर अन् चीनच्या सीमेवर खुंजेरब खिंडीनजीक स्थापन करण्यात आला आहे.
जगातील काही सर्वात अजब ठिकाणांवर असलेल्या एटीएमच्या यादीत चीन सीमेवरील ही एटीएम देखील सामील आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानात असलेल्या खुंजेरब खिंडीनजीक हे एटीएम आहे. नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानचा हा एटीएम 2016 मध्ये तेथे स्थापन करण्यात आला होता, तो सौर अन् पवन ऊर्जेने संचालित होतो. दुर्गम भागातील या एटीएमचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे.
हे एटीएम अत्यंत उंचीवर स्थापन करण्यात आले असले तरीही त्याची नियमित देखभाल होत असते. यापासून सर्वात नजीकची बँक शाखा 82 किलोमीटर अंतरावर असून तेथूनच रक्कम भरण्याचे काम केले जाते. एटीएमपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार वारे, वादळ, भूस्खलन आणि पर्वतीय क्षेत्रातून जावे लागते. बॉर्डर गार्ड्सना येथून स्वतःचा पगार काढता यावा म्हणून हा एटीएम स्थापन करण्यात आला आहे.