सोनाली फोगट खूनप्रकरणाचे गूढ कायम : पाळेमुळे शोधण्यासाठी पोलीस जाणार हरियाणात
प्रतिनिधी /पणजी
भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांचा खून केल्याचा गुन्हा हणजूण पोलिसांनी नेंद केला असला तरी अद्याप खून करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. हे प्रकरण गोव्यात झाले असले तरी याची पाळेमुळे हरियाणात असण्याची शक्यता असल्याने खून प्रकरणाच्या तपासासाठी गोवा पोलीस हरियाणाला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली.
सोनाली फोगट यांचा राजकीय हेतूने काटा काढला असावा काय आणि ते काम फोगट यांचा स्वीय सचिव सुधीर सांगवानकडे दिले होते काय, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
खुनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
सोनाली यांनी हरियाणात भाजप तिकिटावरून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्याच जागेसाठी अन्य कोणी प्रयत्न करीत आहे काय, आणि पुढील निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी सोनाली यांचा काटा काढला असावा काय, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. सोनाली यांचा खून करण्यात आला, याबाबत पोलिसांच्या संशयाला दुजोरा मिळत असला तरी खून करण्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट होत नाही. खून केला असेल तर त्यामागे उद्देश काय असावा, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सोनाली यांना बळजबरीने ड्रग्स पाजून खून करण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद केले असून त्याबाबत संशयितांची उलटतपासणी केली असता संशयितांनी त्यांना ड्रग्स पाजल्याचे मान्य केले आहे. तसे सीसीटीव्ही फुटेजमध्येही स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत पाचजण पोहोचले कोठडीत
आतापर्यंत या खून प्रकरणात पाच संशयितांना अटक केली आहे. संशयित दत्तप्रसाद गावकर, रामदास उर्फ रामा मांद्रेकर, एडविन नुनीस यांना एनडीपीएस कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाचही संशयित पोलीस कोठडीत आहेत.
रामदासला ड्रग्ज देतो कोण?
संशयित दत्तप्रसाद गावकर हा कर्लीज हॉटेलमध्ये रुम बॉय म्हणून काम करीत होता. सुखविंदर सिंग याने दत्तप्रसाद याच्याकडे ड्रग्सची मागणी केली असता त्याने ड्रग्स पॅडलर रामदास मांद्रेकर याच्याकडून ड्रग्स आणला आणि सुखविंदर सिंग याला दिला होता. रामदास हा हणजूण येथे दुचाकी भाडय़ाने देण्याचे काम करीत असतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो ड्रग्स कुणाकडून घेतो त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
ड्रग्ज विक्रीचा म्होरक्या फरार
हणजूण येथील ड्रग्ज विक्रीच्या म्होरक्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता तो फरार असल्याचे आढळून आले आहे. हणजूण वागातोर हा भाग ड्रग्जचा हॉट स्पॉट बनला असून ड्रग्ज विक्रेत्या म्होरक्याला अटक केल्यानंतर अनेकांचे पितळ उघडे पडणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.
सोनालींना पार्टीत पाजला ड्रग
सोमवार 22 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 च्या सुमारास पार्टी करण्यासाठी ज्या कर्लीज हॉटेलमध्ये सोनाली आल्या त्याच हॉटेलात सुखविंदर सिंग याच्या दोन मैत्रीणी आल्या होत्या. त्याच्यातील एकीचा वाढदिवस होता. सर्वांनी मिळून तिचा वाढदिवस साजरा केला आणि नंतर पार्टीला रंग चढू लागला होता. तिघांनीही ड्रग्स घेतला होता. त्यात सुधीर सांगवान याने सोनाली फोगट यांना ड्रग्स पाजला होता.
सुधीर खून कशासाठी करेल?
संशयित सुधीर सांगवान हा 2019 सालात एका विवाह समारंभात सोनाली फोगट यांना भेटला होता. सुधीरची पत्नी शिक्षिका असून सुधीरने एलएलबीपर्यंत शिक्षण घेऊन तो एक व्यावसायिक आहे. सोनाली आणि सुधीर यांची जवळीक वाढल्यानंतर तो सोनालीचे सगळे व्यवहार पाहू लागला. विधानसभा निवडणुकीत फोगट यांना सुधीरने चांगली मदत केली होती. कोटय़वधी रुपयांची मालकीण असलेल्या सोनाली म्हणजे सुधीरसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनली होती. त्यामुळे सुधीर सांगवान त्यांचा खून कशासाठी करेल, असा प्रश्न उपस्थित होतो.
पोलिसांच्या तपासकामावर पूर्ण विश्वास : मुख्यमंत्री
सोनाली फोगट खून प्रकरणी गोवा पोलिसांनी चालवलेल्या तपासकामावर आपला पूर्ण विश्वास असून ते या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर काढतील, अशी खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. सदर तपासकामाचा अहवाल हरियाणाचे मुख्यमंत्री व डिजीपी यांना पाठवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे सर्व केल्यानंतरही जर हरियाणाचे मुख्यमंत्री किंवा डिजीपी असमाधानी असतील तर सदर प्रकरण सीबीआयकडे देण्याबाबत विचार करण्यात येईल, त्यासाठी आमची कोणतीही हरकत नाही, असे निवेदन डॉ. सावंत यांनी केले.