‘भोला’ चित्रपट 30 मार्चला झळकणार, अजय देवगण अन् तब्बू मुख्य भूमिकेत
अजय देवगण आता ‘भोला’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हातात भगवद्गीता आणि कपाळावर भस्म लावलेला अजय देवगणचा लुक चाहत्यांना भावला आहे. अजय देवगणने आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अजय देवगणचा हा चित्रपट 30 मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
‘भोला’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून यात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तसेच त्याने याचे दिग्दर्शन करत निर्मितीची जबाबदारीही उचलली आहे. चित्रपटाचा टीझर अन् पोस्टर शेअर करण्यात आले असून यात अजय देवगणचा लुक दिसून येत आहे. हा चित्रपट अजय देवगणच्या कारकीर्दीतील आतापर्यंतचा सर्वात ऍडव्हेंचरस चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बूची केमिस्ट्री चाहत्यांना बघायला मिळेल. दोघांचाही परस्परांसोबतचा 9 वा चित्रपट असणार आहे.
हा चित्रपट सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात कार्थी शिवकुमारने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर लोकेश कनगराजने दिग्दर्शन केले होते मोशन पोस्टर शेअर करत अजयने कॅप्शनमध्ये ‘एक चट्टान, सौ शैतान’ असे नमूद केले आहे. हा चित्रपट 3डीमध्ये प्रदर्शित होणार आहे.