खासदार विनय तेंडुलकर यांची ग्वाही : चैतन्य सेवा संघटनेचा सत्कार आणि देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघासाठी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दोन लोकापयोगी प्रकल्पांचा प्रस्ताव ठेवल्यास खासदार निधीतून ते पूर्ण केले जातील, अशी ग्वाही राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली. शेतकरी सेवा सभागृहात चैतन्य सेवा संघटनेतर्फे पेडणे तालुक्मयातील विविध स्तरावर कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आणि देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या आयोजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार प्रवीण आर्लेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी आमदार दामू नाईक, पेडणे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, सहकार क्षेत्रातील अधिकारी किशन फडते, चैतन्य सेवा संघटनेचे उत्तम रेडकर, विनिशा तांबोस्कर, आदिती रेडकर, भारती वडवलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, माजी जिल्हा पंचायतसदस्य तुकाराम हरमलकर, पत्रकार निवृत्ती शिरोडकर, पत्रकार महादेव गवंडी, चित्रकार पी. ए. सूर्यवंशी, वैभव नाईक, विकास आराबेकर, आमदार प्रवीण आर्लेकर, पेडणे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई आदींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
माजी आमदार दामू नाईक यांनी, चैतन्य सेवा संघटना ज्या पद्धतीने कार्य करत आहे ते कार्य वाखाण्याजोगे आहे. अशा संघटनेला सरकार बरोबरच भाजपा पक्षानेही आर्थिक पाठबळ द्यावे आणि त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावाडे यांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.
भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी, चैतन्य संघटनेने ज्या मान्यवरांचा गौरव आणि स्पर्धा आयोजित करून आपली समाजाविषयी असलेली भावना व्यक्त करण्याचं काम केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी, सरकार पेडणे तालुका अग्रेसर मतदारसंघ बनवण्यासाठी कार्यरत आहे. खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच प्रकल्पांचा प्रस्ताव त्यांच्याकडून घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर कृतिका तांबोस्कर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उत्तम रेडकर यांनी सूत्रसंचालन केले. आदिती रेडकर यांनी सत्कार मूर्तीचा परिचय केला. यावेळी घेण्यात आलेल्या देशभक्ती गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेच्या वर्धापन दिनी 14 एप्रिल 2023 च्या दिनी देण्यात येईल असे जाहीर केले.