आयुक्त आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
येथील मांडवी तीरावर अष्टमीच्या फेरीसाठी झालेल्या अर्जविक्रीतील काळाबाजार आणि इतर प्रकरणाची चौकशी करण्याचे पणजी महानगरपालिकेने ठरवून ती सुरुही झाल्याची माहिती पणजी मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली आहे. स्टॉलसाठी व अर्जांसाठी देखील काळाबाजार झाल्याचे ऐकिवात आले असून सत्य शोधून काढण्याकरीता चौकशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, पहिल्या फेरीत झालेल्या अर्जविक्रीत गोंधळ उडाला. एका विक्रेत्याने तर 10 अर्ज घेतले आणि ते अर्ज नंतर 5 हजार ते 10 हजारला विकले. शिवाय स्टॉलदेखील एकाने घेऊन दुसऱयाला विकले. असे प्रकार घडल्याचे कानावर आले असून त्यातील सत्य समोर यावे म्हणून चौकशी करण्यात येणार आहे. एकाच विक्रेत्याकडे 10 अर्ज कसे पोहोचले? हा विषय महत्त्वाचा असून चौकशीतून काय ते समोर येईल, असेही फर्नांडिस म्हणाले.
दोन वेळा झाले अर्जांचे वितरण
अर्ज विक्रीच्या पहिल्या फेरीत गोंधळ झाला म्हणून ती फेरी स्थगित करुन अर्जविक्री नव्याने करण्यात आली. त्यात प्रथम येणाऱयास प्रथम या तत्वावर विक्री करण्यात आली आणि एकाला एकच अर्ज देण्यात आला होता. पहिल्या फेरीतील अर्ज रद्दबातल ठरविण्यात आले, असेही फर्नांडिस यांनी नमूद केले.
प्रति अर्ज रु. 200 असा दर होता आणि ते अर्ज सर्वांना देण्यात आले. भेदभाव करण्यात आला नाही. उलट गोमंतकीयांना प्राधान्य देण्यात आले असल्याचा दावा फर्नांडिस यांनी केला.
दरम्यान, अष्टमी फेरीमधील अर्जविक्री, स्टॉल वितरणातील गोंधळ आता संपुष्टात आला असून ती पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे आणि ग्राहक त्यासाठी खरेदीकरीता गर्दी करताना दिसत आहेत.