स्थानिक डॉक्टर ताब्यात : मृतदेह फेकला कालव्यात, पाणी अडवून दिवसभर शोध : मृतदेह सापडल्यानंतरच उलगडा
वार्ताहर /घटप्रभा
गोकाक येथील उद्योजक राजेश ऊर्फ मुन्ना सत्यनारायण झंवर (वय 53) बेपत्ता प्रकरणाला कलाटणी मिळाली असून आर्थिक व्यवहारातून अपहरण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. खुनानंतर त्यांचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला आहे. रविवारी रात्रीपर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी रात्रीपासून राजेश झंवर हे बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबियांनी गोकाक शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. गोकाक येथील सिटी हेल्थ केअरचे डॉ. सचिन शिरगावी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी गोकाकला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक डी. एच. मुल्ला, मंडल पोलीस निरीक्षक प्रकाश यातनूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास हाती घेतला आहे. तालुक्यातील कोळवीजवळ मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. रविवारी रात्रीपर्यंत तपास यंत्रणेला याकामी यश आले नाही. सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.
प्रतिष्ठित उद्योजकाचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मृतदेह जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत काहीच अधिकृतपणे सांगता येत नाही. संशयावरून डॉ. सचिव शिरगावी यांच्यासह तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. उद्योजक राजेश यांचे अपहरण करून खुनानंतर मृतदेह कॅनॉलमध्ये टाकल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मृतदेह सापडल्यानंतरच या खून प्रकरणावर उजेड पडणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्ध माहितीनुसार राजेश ऊर्फ राजू झंवर हे गोकाकमधील प्रसिद्ध उद्योजक होते. त्याच गावातील डॉ. सचिन यांच्याशी त्यांची मैत्री होती. उभयतात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही झाले होते. सध्या राजू रिअल इस्टेट व्यवसायही करीत होते. जमीनवाद किंवा आर्थिक व्यवहारातून राजूचा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी सायंकाळी राजू यांचा शेवटचा कॉल डॉ. सचिन यांच्याबरोबर झाला आहे. त्यानंतर राजू यांचा मोबाईल स्वीचऑफ झाला. कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी डॉ. सचिन यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सारा प्रकार उघडकीस आला असून कोळवीजवळ कॅनॉलचे पाणी बंद करून रविवारी दिवसभर मृतदेहासाठी शोध घेण्यात आला. सोमवारी सकाळपासून मृतदेहासाठी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
कोल्हापूर पोलिसांचीही एंट्री!
गावठी पिस्तूल प्रकरणात कोल्हापूर पोलीसही याच डॉ. सचिन शिरगावी यांची चौकशी करण्यासाठी गोकाकमध्ये दाखल झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या जबानीतून डॉक्टरचे नाव बाहेर पडल्यामुळे पोलीस गोकाकमध्ये दाखल झाले होते. मात्र, उद्योजक खून प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे ही कारवाई होऊ शकली नाही. उद्योजकाच्या खुनासाठी स्थानिक तरुणांचा वापर झाल्याची माहिती उजेडात आली असून मृतदेह सापडल्यानंतरच बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे.