मृतदेहाची ओळख पटविणेही अशक्य : आणखी किती खून पचविणार?
प्रतिनिधी /बेळगाव
मुतगा येथे अज्ञात तरुणाचे शिर धडावेगळे करून खून करण्यात आला आहे. दोन दिवसांनंतरही या प्रकरणाचे गूढ उलगडण्यात पोलीस दलाला यश आले नाही. उलट गूढ अधिक गडद होत चालले आहे. निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे गुन्हेगार चांगलेच माजले असून आणखी किती खून पचविणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शशिकांत मल्लाप्पा अष्टेकर (रा. मुतगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारिहाळ पोलीस स्थानकात भा.दं.वि. 302, 201 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांचे सहकारी याप्रकरणी तपास करीत आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत मृतदेहाची ओळख पटविणेही शक्मय झाले नाही.
सुमारे 25 ते 35 वषीय अनोळखी तरुणाचे शिर धडावेगळे करून त्याचा मृतदेह मुतगा येथील विहिरीत टाकण्यात आला आहे. पोलिसांनी शिरविरहित धड ताब्यात घेतले आहे. उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला आहे. दुसऱया दिवशीही मुंडके शोधण्याचे काम सुरू होते.
कोठे तरी खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी या तरुणाचा मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला आहे की याच परिसरात खून झाला आहे? याचा तपास करण्यात येत आहे. त्या तरुणाचे दोन्ही पाय दोरीने बांधण्यात आले होते. साखळीने हात व पोटाला बांधण्यात आले होते. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी केवळ बेळगावच नव्हे तर राज्यातील व परराज्यातील पोलीस स्थानकांनाही यासंबंधीची माहिती पाठविण्यात आली आहे.
‘त्या’ खुनांचा अद्याप तपास नाही
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 26 नोव्हेंबर 2020 रोजी कबलापूर (ता. बेळगाव) जवळ निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31, मूळचा रा. उदगीर, जि. लातूर) या खासगी कंपनीतील कर्मचाऱयाचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आल्याचे आढळून आले होते. याचदिवशी मारिहाळ पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा दीड वर्षानंतरही तपास लागला नाही. तर काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 28 ऑक्टोबर 2020 रोजी लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय 45, मूळचा रा. हन्नीकेरी, ता. बैलहोंगल) या रखवालदाराचा सोनट्टीजवळील एका फार्महाऊसमध्ये खून करण्याचे उघडकीस आले होते. दीड वर्षानंतरही या प्रकरणाचा उलगडा झाला नाही. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सुळगा (येळ्ळूर) शिवारात खून करून एका युवकाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत टाकून देण्यात आला होता. 25 एप्रिल 2022 रोजी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता. दुसऱया दिवशी मृतदेहाची ओळख पटली. ए. कुमार (वय 37, रा. के.आर.पेठ, जि. मंडय़ा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचाही अद्याप तपास लागला नाही. सध्या सुरू असलेली खुनांची मालिका थक्क करणारी असून बेळगावात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळत चालल्याचे दिसून येत आहे.