घराचा दरवाजा बंद होता की उघडा? पोलीस तपास जारी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खुनाचे गूढ दोन दिवसांनंतरही अधिक गडद झाले आहे. मारेकरी कोण? कोणत्या कारणासाठी त्याचा खून केला? याचा उलगडा झाला नाही. कॅम्प पोलीस वेगवेगळय़ा अंगाने या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सुधीर भगवानदास कांबळे (वय 57) रा. मद्रास स्ट्रीट, कॅम्प या रिअल इस्टेट व्यावसायिकाचा खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. सुधीर यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, खून प्रकरणाचा उलगडा होईल, अशी कसलीच माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत. कुटुंबीयांकडून अधिक माहिती घेण्याचा निर्णय अधिकाऱयांनी घेतला आहे. मात्र, रविवारी दुपारी अंत्यसंस्कार झाल्यामुळे त्यांची चौकशी करता आली नाही. एक-दोन दिवसांत कुटुंबीयांकडून सुधीर यांच्यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यात येणार आहे.
फिश मार्केटजवळील इमारतीत तिसऱया मजल्यावर सुधीर कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होते. घराचा दरवाजा बंद होता की उघडा? रात्री दरवाजा कोणी उघडला? आदी प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. शनिवारी सकाळी मोलकरणीने समोरच्या दरवाजाने घरात प्रवेश केला. त्यामुळे दरवाजा उघडा होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंबीयांकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच तपासाला चालना मिळणार आहे.