मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोप येथे दिली माहिती : विमानतळाला नाव देण्याचा निर्णय नागरी विमान उड्डाण मंत्रालय घेणार
प्रतिनिधी /पणजी
मोप विमानतळाला नाव देण्यासाठी गोवा सरकार केंद्र सरकारकडे भाऊसाहेब बांदोडकर व मनोहर पर्रीकर ही दोन्ही नावे पाठविणार आहे. विमानतळाला नाव देण्याचा निर्णय नागरी विमान उड्डाण मंत्रालय घेईल. त्याचबरोबर गोवा सरकारही त्यांच्याकडे चर्चा करणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पणजीतील पत्रकारांसमवेत मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार प्रविण आर्लेकर, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, जीएमआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेषन, नागरी विमान वाहतूक संचालक डॉ. शानभाग आदींची उपस्थिती होती.
राज्य सरकार दोन्ही नावे पाठविणार
मोप विमानतळाला नाव देण्यावरून सध्या दोन गट पडले आहेत. एका गटाने पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली आहे, तर अन्य घटकांनी माजी मुख्यमंत्री तथा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. आम्ही दोन्ही नावे पाठविणार असून मंत्रालयच योग्य तो निर्णय घेईल, असे मुख्यम्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मोप विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार असून 8 डिसेंबर नंतर ते केव्हाही होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. विमानतळ पूर्ण वेगाने सज्ज होत असून आतापर्यंत 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. उद्घाटनाच्या तारखेपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महामार्गाला जोडरस्त्याच्या कामाचा आढावा
मोपवरून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱया रस्त्याच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. हा रस्ता पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तोपर्यंत विद्यमान ग्रामीण भागातून जाणाऱया रस्त्याचाच वापर होणार असून त्याचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरण काम हाती घेण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विमानतळाची बहुतांश कामे पूर्णत्वाकडे
सध्या विमानतळावरील एटीएस कक्ष आणि प्रमुख टर्मिनल इमारत पूर्ण झाली आहे. धावपट्टीही विमानांसाठी सज्ज आहे. विमानतळाला ऍरोड्रोम परवाना प्राप्त झालेला आहे. अनेक विमान कंपन्यांशीही करार करण्याचे कामही सुरू झाले आहे. सध्या केवळ अंतर्गत आणि बाहेरील सौंदर्यीकरणाची कामे शिल्लक असून ती नियोजित वेळेत पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, राज्यातील दोन्ही विमानतळ चालू राहतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळ चालूच राहतील याबद्दल कोणत्याही शंकेस वाव राहू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या वर्षात 4.4 दशलक्ष प्रवासी वाहतूक अपेक्षित : शेषन
देशांतर्गत वाहतुकीसाठी अनेक कंपन्यांनी इच्छा व्यक्त केली असून सुमारे 100 स्लॉट आरक्षित झाले आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशीही बोलणी सुरु आहेत. प्रारंभी देशांतर्गत वाहतुकीवरच भर दिला जाणार आहे. प्रत्यक्ष उद्घाटनानंतर त्यात वाढ होईल. प्रवाशी तसेच कार्गो अशा दोन्ही प्रकारच्या विमानांची येथून वाहतूक होईल, आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक नवीन वर्षात जानेवारीपासून प्रारंभ होईल, त्यात प्रारंभी चार ते पाच कंपन्यांची विमाने उतरणार आहेत, नंतर त्यात वाढ करण्यात येईल, अशी माहिती शेषन यांनी दिली.
या विमानतळावरून पहिल्या वर्षात अंदाजे 4.4 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक होईल. दरम्यानच्या काळात विमानांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांच्या संख्येतही वाढ अपेक्षित आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विमानतळ पाहणीवेळी नाराजी नाटय़
मोप विमानतळ प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येणार आहेत, पण त्याचे आमंत्रण स्थानिक आमदार, सरपंच, उपसरपंच तसेच इतर प्रतिनिधींना दिले नाही, यावरुन काल शुक्रवारी दुपारी विमानतळाच्या परिसरात गोंधळ झाला.
मोप परिसरातील सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य तसेच नागरिकांनी मोप विमानतळाच्या गेटवर जमून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. आपल्या भागातील विकासकामे कधी होणार, मोप पीडितांना रोजगार, नुकसान भरपाई कधी मिळणार असे प्रश्न विचारले. तसेच स्थानिक नेत्यांना आमंत्रण का नाही? यावरुन नाराजीही व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना अगोदर विमानतळाची पाहणी करुन येतो नंतर सर्वांशी चर्चा करतो असे सांगून सर्वांची समजूत काढली आणि ते विमानतळाची पाहणी करण्यासाठी गेले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना मोप विमानतळाच्या गेटवर स्थानिक लोक जमल्याचे कळताच त्यांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सोबत घेतले आणि विमानतळ गाठले. यावेळी विमानतळ गेटवर भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, मोप सरपंच सुबोध महाले, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, तोरसे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर तसेच इतर पंचसदस्य व नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गेटवरील स्थानिक नेत्यांना एका सभागृहात बसण्याची व्यवस्था केली पण ती अपुरी असल्याने सरपंचांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री मोप विमानतळ पाहणीसाठी पणजीतील पत्रकारांना सोबत घेऊन आले होते, मात्र पेडणेतील पत्रकारांना डावळल्यामुळे स्थानिक पत्रकारांनीही नाराजी व्यक्त केली.
विमानतळ पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितले की, आपण येथे फक्त साधी पाहणी व पणजीतील पत्रकारांना विमानतळ दाखविण्यासाठी आणले होते. आपण पुन्हा येथे येणार असून त्यावेळी स्थानिक सरपंच, उपसरपंच, नेत्यांना घेऊन बैठक घेणार असल्याचे सांगितले. तसेच विमानतळ पाहणीवेळी आपण सर्व पत्रकारांना बसमधून नेण्याचे सांगितले होते मात्र नजरचुकीने पेडणेतील पत्रकार यातून बाजूला राहिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.