पुणे / प्रतिनिधी :
शिंदे सरकारमधील खातेवाटपाकडे राजकीय वर्तुळाचे आता लक्ष लागले असून, पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महेश लांडगे व राहुल कुल यांची नावे प्रामुख्याने चर्चेत असल्याचे दिसत आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मतदारसंघातील आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी त्यांना या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. फडणवीस सरकारमध्येही चंद्रकांतदादा दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. आताही त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. मात्र, चंद्रकांतदादांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी धक्कातंत्र तर वापरणार नाहीत ना, अशीही एक शंका व्यक्त केली जात आहे.
पर्वती मतदारसंघातील भाजपाच्या ज्येष्ठ आमदार माधुरी मिसाळ यांनाही मंत्रिपद मिळण्याची आशा आहे. त्या तिसऱ्यांदा पर्वतीतून निवडून आलेल्या आहेत. त्यांची किंवा माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
याशिवाय पुणे जिल्ह्यातून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नावही चर्चेत आहे. लांडगे हे पिंपरी-चिंचवडमधील बलाढय़ राजकारणी मानले जातात. त्यांना मंत्रिपद देऊन पिंपरीला प्रतिनिधीत्व देण्याचा भाजपाचा प्रयत्न असू शकतो. लक्ष्मण जगताप हेही शहरातील ज्येष्ठ आमदार आहेत. मात्र, त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने त्यांचे नावे मागे पडू शकते. याशिवाय दौंडचे आमदार राहुल कुल यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कुल हे 2014 मध्ये दौंड विधानसभा मतदारसंघातून रासपच्या तिकीटावर निवडून आले होते. तर 2019 मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकीटावर विजय मिळविला होता. त्यांच्या माध्यमातून जिल्हय़ाला प्रतिनिधीत्व मिळण्याची अपेक्षा आहे.
पुण्यातून बंडखोर नाही
पुणे जिल्ह्यातून मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. स्वाभाविकच बंडखोर गटात पुण्याचा आमदार नाही व पर्यायाने येथून बंडखोरास प्रतिनिधीत्वही मिळणार नाही. मात्र, माजी आमदार विजय शिवतारे यांनी शिंदे गटास पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.