संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला केले संबोधित
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित केले आहे. ‘सुरक्षित आणि स्वच्छ जग’ प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असून तो जागतिक स्तरावर एकत्र काम करूनच प्राप्त केला जाऊ शकतो असे तिने म्हटले आहे. निरंतर विकास लक्ष्यांना (एसडीजी) प्राप्त करण्यास 8 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना अभिनेत्रीने हे विधान केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या ‘एसडीजी मोमेंट’च्या एका बैठकीत प्रियांकाने जगासमोरील कोरोना महामारी, हवामान बदल आणि गरीबी यासारख्या मोठय़ा आव्हानांवर भूमिका मांडली आहे. जागतिक स्तरावर एकजुटता पूर्वीपेक्षा अधिक गरजेची असताना ही बैठक आम्ही करत आहोत असे प्रियांकाने म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या भयावह परिणामांना अनेक देश तोंड देत आहेत. हवामान बदल जीवन आणि उपजीविकेला प्रभावित करत आहे. संघर्ष वाढत असून गरीबी, विस्थापन, उपासमारी तसेच विषमतेमुळे जागतिक व्यवस्था कमकुवत होत आहे. आमच्या या जगात सर्वकाही सुरळीत नाही. संकट अचानक येत नाही, योजनेद्वारे त्यावर मात करता येते. आमच्याकडे संयुक्त राष्ट्रसंघ निरंतर विकास लक्ष्याची योजना असल्याचे प्रियांका म्हणाली.
निरंतर विकास लक्ष्यांना 2015 मध्ये जगभरातील लोकांना मिळून निश्चित केले होते. आम्ही ज्या जगात राहत आहोत, ते बदलण्याची आमच्याकडे एक असाधारण संधी असल्याचे तिने म्हटले आहे. एसडीजी हे दारिद्रय़ाचे उच्चाटन, पृथ्वीचे रक्षण आणि प्रत्येकाचे जीवन उत्तम करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक सार्वभौमिक पुढाकार आहे. याच्या 17 लक्ष्यांना 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांनी स्वीकारले होते. याच्या अंतर्गत लक्ष्यांना गाठण्यासाठी 15 वर्षांची योजना तयार करण्यात आली आहे.