अमेरिकेवर 3-1 गोलफरकाने मात, डम्फ्रीजची चमक
वृत्तसंस्था/ अल रय्यान
येथील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सने अमेरिकेचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सर्वप्रथम प्रवेश मिळविला. या पराभवामुळे अमेरिकेचे आगेकूच करण्याचे स्वप्न मात्र भंगले. डम्फ्रीजने एक गोल केला आणि अन्य दोन गोलसाठी त्याने मदत करीत चमक दाखविली.
मेम्फिस डीपे, डॅली ब्लाईंड, डेन्झेल डम्फ्रीज यांनी नेदरलँड्सचे गोल केले तर अमेरिकेचा गोलही नेदरलँड्सच्याच बदली खेळाडू हाजी राईटने नोंदवला. नेदरलँड्सला आजवर एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. यापूर्वी तीनवेळा त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. पण शेवटी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यांची उपांत्यपूर्व लढत अर्जेन्टिना किंवा ऑस्ट्रेलिया यापैकी एका संघाशी होईल.
या सामन्याच्या पूर्वार्धात अमेरिका बॉल पझेशनच्या बाबतीत बराच काळ सरस ठरले होते. पण अखेरच्या टप्प्यात संयम राखता न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेचा आघाडीवीर ख्रिस्तियन पुलिसिकने तिसऱयाच मिनिटाला मिळालेली सुवर्णसंधी वाया घालवली. त्याने मारलेला फटका गोलरक्षक अँड्रीज नोपर्टने अचूक अडविला. यानंतरही त्यांचे आक्रमण सुरूच राहिले. मात्र दहाव्या मिनिटाला मेम्फिस डीपेने नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली. त्याचा हा 44 वा आंतरराष्ट्रीय गोल होता. डीपेला यासाठी डम्फ्रीजकडून चेंडू मिळाला होता. पूर्वार्धातील एक मिनिटाच्या जादा वेळेत डॅली ब्लाईंडने ही आघाडी 2-0 अशी केली. या गोलसाठीही डेन्झेल डम्फ्रीजने मदत केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या चेंडूला ब्लाईंडने गोलजाळय़ाच्या बॉटम कॉर्नरमध्ये पाठविले.
उत्तरार्धात 76 व्या मिनिटाला अमेरिकेला बोनस गोल मिळाला. बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या हाजी राईटने चेंडू आपल्या गोलमध्ये जाण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेच्या पुलिसिककडून आलेला चेंडू त्याला स्पर्श करून साईडबारला लागल्यानंतर आपल्याच जाळय़ात गेला. 81 व्या मिनिटाला डम्फ्रीजने नेदरलँड्सला दोन गोलांची आघाडी पुन्हा मिळवून दिली. त्याने ब्लाई&ंडकडून मिळालेल्या क्रॉसवर अगदी जवळून मारलेली व्हॉली जाळय़ात जाऊन विसावली. ही आघाडी कायम राखत नेदरलँड्सने शेवटच्या आठ संघांतील स्थानही निश्चित केली.