Tarun Bharat

भारतासमोर आज नेदरलँड्सचे तगडे आव्हान

Advertisements

एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये पुरुष गटातील शेवटची लढत

रॉटरडॅम / वृत्तसंस्था

आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत पोडियम फिनिश, ही महत्त्वाकांक्षा नजरेसमोर असणारा भारतीय संघ आज (शनिवार दि. 18) नेदरलँड्सविरुद्ध शेवटच्या लढतीत एफआयएच प्रो लीग मोहिमेची विजयी सांगता करण्यासाठी प्रयत्नशील असेल. यापूर्वी मागील लढतीत भारताने टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन्स बेल्जियमला शूटआऊटमध्ये 5-4 अशा निसटत्या फरकाने मात दिली. ती लढत निर्धारित वेळेत 3-3 अशी बरोबरीत राहिली होती तर दुसरा सामना गमविला होता. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या 14 सामन्यात 29 गुणांसह तिसऱया स्थानी विराजमान आहे.

बेल्जियमचा संघ 14 सामन्यात 31 गुण मिळवण्यात यशस्वी झाला असून नेदरलँड्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. गुणतालिकेत अद्यापही अव्वलस्थानी विराजमान होण्याची शक्यता असलेला भारतीय संघ आज नेदरलँड्सविरुद्ध पूर्ण अनुभव पणाला लावेल. पण, जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानी असलेल्या व विद्यमान वर्ल्डकप उपविजेत्या असलेल्या नेदरलँड्सला नमवणे इतके सहजसोपे नक्कीच नसेल. या डबल-लेग टायमध्ये ते भारताविरुद्ध कडवे आव्हान उभे करणे अपेक्षित आहे.

युरोपियन कंडिशन्समध्ये जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जाण्याचा हा अनुभव भारतीय खेळाडूंसाठी भविष्यात अधिक उपयुक्त ठरेल. विशेषतः सध्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने ही लढत खास स्वरुपाची आहे. आगामी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा दि. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

यापूर्वी, जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित बेल्जियमविरुद्ध अमित रोहिदासच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दोन्ही सामन्यात जबरदस्त संघर्ष साकारला आणि हीच घोडदौड आता नेदरलँड्सविरुद्ध कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असू शकतो.

भारताचा उपकर्णधार व आघाडीचा ड्रग फ्लिकर हरमनप्रीत सिंगच्या मते बेल्जियम व नेदरलँड्सविरुद्ध सामन्यातील अनुभव बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत संघासाठी उपयुक्त ठरेल. ‘प्रत्येक सामन्यातून आम्ही काही नवे धडे आत्मसात करत आलो आहोत. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम 12 संघांविरुद्ध खेळत असताना सातत्याने खेळात धोरणात्मक बदल करावे लागतात’, असे तो याप्रसंगी म्हणाला.

भारतीय संघाला ही लीग जिंकण्याची आताही संधी आहे. मात्र, तूर्तास मोहिमेची यशस्वी सांगता करणे, हे एकच आपल्यासमोर लक्ष्य आहे, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. या स्पर्धेतील महिला गटात भारतीय संघाची पुढील लढत जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित व ऑलिम्पिक रौप्यजेते अर्जेन्टिनाविरुद्ध होत आहे. अर्जेन्टिनाचा संघ मागील 14 लढतींपासून अपराजित आहे. भारतीय महिला संघ मागील लढतीत बेल्जियमविरुद्ध 0-5 अशा एकतर्फी फरकाने पराभूत झाले. ही लढत ऍन्टवर्प येथे झाली होती.

Related Stories

कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

prashant_c

भारतीय महिलांचा इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिकाविजय!

Amit Kulkarni

‘आठवे’ आश्चर्य नव्हे, पण नेपाळ सर्वबाद 8!

Patil_p

सौरव घोषाल उपांत्य फेरीत दाखल

Patil_p

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 62 धावांनी धुव्वा

Amit Kulkarni

हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांना मुदतवाढ

Patil_p
error: Content is protected !!