वाहतुक कोंडी कायमची संपुष्टात येण्याची आशा
प्रतिनिधी /वास्को
गेल्या काही वर्षांपासून ज्या पुलाची गोव्यातील नागरिकांना प्रतीक्षा होती, तो पुल अखेर गुरूवारी मध्यरात्री ऐवजी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाहतुकीला खुला झाला. हा पुल खुला झाल्याने आता गेल्या अनेक वर्षांपासून मडगाव पणजी मार्गावरील वाहतुक कोंडीची समस्या कायमची संपुष्टात येईल अशी आशा आहे.
झुआरी नदीवर उत्तर गोवा व दक्षिण गोव्याला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी एकच पुल असल्याने व वाहनांची वाढत्या संख्येमुळे तो अपुरा पडत असल्याने सहा वर्षांपूर्वी झुआरी नदीवर आठ पदरी नवीन अत्याधुनिक पुल उभारण्यासाठी पायाभरणी करण्यात आली होती. या पुलाच्या कामासह बांबोळी ते वेर्णापर्यंतच्या महामार्गाच्या कामाला सहा वर्षांपूर्वी सुरवात झाली होती. मागच्या सहा वर्षात याच पुल आणि महामार्गाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड त्रासाला सोमोरे जावे लागले. या मार्गावरील प्रवाशांनी अनेक अडचणी व यातना सहन केल्या. गेल्या काही वर्षांत या मार्गावर सकाळ, दुपार व संध्याकाळच्या वेळचा प्रवास बेभरवशाचा ठरला होता. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात ही समस्या अधिकच गंभीर बनत होती. इतकी वर्षे कष्ट सोसलेल्या या मार्गावरील प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. आता या मार्गावरील वाहतुक कोंडीची समस्या कायमची संपुष्टात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पुढील वर्ष दीड वर्षांत राहिलेल्या चौपदरी पुलही पूर्ण होण्याची आशा असल्याने मडगाव पणजी तसेच पणजी मडगाव व वास्कोपर्यंतचा प्रवासही आणखी जलद आणि सुखद होणार आहे.
गुरूवारी रात्री झुआरीवरील पहिल्या चौपदरी पुलाचे केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटन केल्याने या पुलावर आनंदोत्सव साजरा झाला. हा नवा पुल गुरूवारी मध्यरात्रीपासून वाहतुकीला खुला होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, या पुलावरील काही अडचणीमुळे आणि काही उपाययोजनांच्या कामांमुळे पुल लगेच खुला होऊ शकला नाही. सर्व गोष्टी सुरळीत करण्यात आल्यानंतर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा पुल सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे मडगाव आणि वास्कोहून पणजीच्या दिशेने जाणाऱया सर्व प्रकाराची वाहनांची प्रशस्त सोय झाली आहे. तसेच बारा टनांपेक्षा अधिक वजनाच्या वाहनांची पणजी मडगाव वास्कोला येण्या जाण्याची सोयही झालेली आहे. सकाळच्या वेळी या मार्गावरून पणजीच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी शुक्रवारी सकाळी नव्या पुलावरून वाहतुकीचा आनंद घेण्यास उत्सुक होते. मात्र, सकाळी पुलाचा रस्ताच खुला न झाल्याने त्यांना जुन्याच पुलावरून प्रवास करावा लागला. हा आनंद अनुभवण्यासाठी त्यांना शनिवारची प्रतीक्षा करावी लागली. ज्यांना शनिवार रविवार सुट्टी आहे ते प्रवासी सोमवारीच नव्या पुलावरून प्रवास करतील. मात्र, हा पुल खुला होण्याआधीच गेल्या दोन दिवसांपासून कुठ्ठाळी, वेर्णा आगशी या मार्गावरील वाहतुक कोंडी दूर झाल्याने प्रवासी वर्गात समाधान आहे.