उल्लंघन केल्यास भरावा लागणार 50 लाखाचा दंड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स (प्रभावशाली व्यक्ती) आणि सेलिब्रिटीजसाठी नवे नियम जारी केले आहेत. या नियमांच्या अंतर्गत स्वतः वापरत असलेल्या उत्पादनांना सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि सेलिब्रिटीज एंडोर्स (समर्थन) करू शकतील. म्हणजेच इन्फ्लुएंसर्स किंवा सेलिब्रिटीज कुठल्याही उत्पादनाबद्दल थाप मारून ग्राहकांची दिशाभूल करू शकणार नाहीत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखादे उत्पादन किंवा सेवेबद्दल स्वतःचे मत मांडून जनमताला प्रभावित करणाऱयांना ‘इन्फ्लुएंसर’ म्हटले जाते. 2022 मध्ये भारतात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाजार 1,275 कोटी रुपयांचा होता, परंतु 2025 पर्यंत यात समारे 12-20 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह 2,800 कोटी रुपयांपर्यंत ही उलाढाल पोहोचण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर प्रभाव पाडणाऱया इन्फ्लुएंसरची देशातील संख्या 1 लाखाहून अधिक झाली आहे. इंटरनेटचा प्रसार वाढण्यासह या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सोशल मीडियावर जाहिरात करत असलेल्या उत्पादन किंवा सेवेशी आपण कसे जोडले गेलो याची माहिती द्यावी लागणार असल्याचे ग्राहक विषयक विभागाच्या सचिवांनी सांगितले आहे.
ग्राहक विषयक मंत्रालयानुसार सरकारच्या या नियमाचे पालन न केल्यास ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या अंतर्गत संबंधिताला दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) उत्पादन, जाहिरातदार आणि एंडोर्सर्सवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावू शकतो. नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. तसेच जाहिरात करणाऱयालाही 6 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंत कुठल्याही एंडोर्समेंटपासून रोखले जाऊ शकते.
दिशानिर्देशात नेमके काय….
-इन्फ्लुएंसर आणि सेलिब्रिटीज अशाच उत्पादनांना एंडोर्स करतील, ज्यांचा ते स्वतः वापर करत आहेत.
-एंडोर्समेंटसाठी मोफत उत्पादने मिळाली का, कंपनीकडून गिफ्ट किंवा ट्रिप्स अशा गोष्टी मिळाल्या का हे सांगावे लागणार आहे.
-तसेच कंपनी किंवा उत्पादनात हिस्सेदारी मिळाली आहे का हे संबंधिताला जाहीर करावे लागेल.
-कंपनी किंवा उत्पादनाशी कौटुंबिक संबंध आहेत का हे देखील संबंधिताला सांगावे लागणार आहे.
जाहिरातीच्या उत्पादनाची माहिती
या दिशानिर्देशांमुळे कुठल्याही उत्पादनासंबंधी चुकीची माहिती देणे किंवा जाणूनबुजून माहिती लपविण्याचा प्रकार थांबणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि सेलिब्रिटीज हे स्वतः वापरत असलेल्या उत्पादनांचीच जाहिरात करू शकणार आहेत असे विधान ग्राहक विषयक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी केले आहे. प्रत्येक सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि व्हर्च्युअल इन्फ्लुएंसरला सोशल मीडिया अकौंटवर प्रचारासाठी पैसे स्वीकारले का किंवा अन्य कुठलेही आर्थिक हित आहे का हे नमूद करावे लागणार आहे. जाहिरात व्हिडिओ किंवा लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये त्यांना वारंवार हे स्पष्ट लेखी दर्शवावे लागणार आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या अंतर्गत ग्राहकांना चुकीच्या व्यापाराच्या पद्धतींपासून वाचविण्याचे दिशानिर्देश शुक्रवारपासून पूर्ण देशात लागू झाले आहेत.