वृत्तसंस्था/ लंडन
विंडीजचा माजी अष्टपैलू केरॉन पोलार्डने क्रिकेट क्षेत्रामध्ये नवा आगळा विक्रम केला आहे. त्याने क्रिकेटच्या टी-20 प्रकारात 600 सामने खेळण्याचा पराक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.
लॉर्डस् मैदानावर द हंड्रेड टी-20 क्रिकेट स्पर्धा सध्या सुरू असून या स्पर्धेत तो लंडन स्पिरीट संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. लंडन स्पिरीट आणि मँचेस्टर ओरिजनल्स यांच्यातील सोमवारी झालेला सामना हा पोलार्डचा 600 वा विक्रमी सामना म्हणून नोंद झाली आहे. या सामन्यात पोलार्डने केवळ 11 चेंडूत 4 उत्तुंग षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 34 धावा जमविल्या. क्रिकेटच्या टी-20 प्रकारात पोलार्डने 600 सामन्यात 31.34 धावांच्या सरासरीने 11,723 धावा जमविल्या आहेत. क्रिकेटच्या या क्रीडा प्रकारात पोलार्डने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना एक शतक (104 धावा) आणि 56 अर्धशतके झळकविली आहेत. गोलंदाजीत पोलार्डने 600 सामन्यात 309 बळी मिळविले आहेत. टी-20 प्रकारात 15 धावांत 4 ही पोलार्डची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीत पोलार्डने विविध स्पर्धांमध्ये टी-20 संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. विंडीजमधील त्रिनिदाद टोबॅगो तसेच आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेत त्याने ऍडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबोर्न रिनेगेडस्, बांगलादेश प्रिमियर लिग (बीपीएल) स्पर्धेत त्याने ढाक्का ग्लॅडिएटर्स आणि ढाका डायनामिक्स, पाक सुपर लिग स्पर्धेत त्याने मुलतान सुल्तान्स आणि पेशावर झेलमी, कॅरेबियन प्रिमियर लिग (सीपीएल) स्पर्धेत ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. टी-20 प्रकारामध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱया क्रिकेटपटूमध्ये केरॉन पोलार्ड 600 सामन्यासह पहिल्या स्थानावर, विंडीजचा ड्वेन ब्रॅव्हो 543 सामन्यासह दुसऱया, पाकचा शोएब मलिक 472 सामन्यासह तिसऱया, विंडीजचा ख्रिस गेल 463 सामन्यासह चौथ्या, रवी बोपारा 426 सामन्यासह पाचव्या स्थानावर आहेत.
लॉर्ड्सवरील झालेल्या मैदानात पोलार्डच्या फटकेबाजीमुळे लंडन स्पिरीट संघाने 100 चेंडूत 6 बाद 160 धावा जमविल्या. या संघाचा कर्णधार मॉर्गनने 37, क्रॉलेने 41 धावा जमविल्या. त्यानंतर मँचेस्टर ओरिजनल्स संघाने 100 चेंडूत 108 धावापर्यंत मजल मारल्याने लंडन स्पिरीटने हा सामना जिंकला. मँचेस्टर ओरिजनल्सतर्फे फिल सॉर्टने सर्वाधिक म्हणजे 36 धावा जमविल्या. लंडन स्पिरीटतर्फे थॉमसनने 21 धावात 4 गडी बाद केले. लंडन स्पिरीटने हा सामने 52 धावांनी जिंकला.