तुर्कस्तान-सीरियात मदतकार्याला गती
अंकारा / वृत्तसंस्था
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 30 हजारांच्या पुढे पोहोचली आहे. भूकंपामुळे विशेषतः टोलेजंग इमारती असलेल्या भागात भयंकर विध्वंस झाला आहे. दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच जखमींचा आकडा 78 हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, तुर्कस्तानच्या 8 प्रांतातून लुटीच्या आरोपाखाली 98 जणांना अटक करण्यात आली आहे.
भूकंपातील मृतांची संख्या दुप्पट असू शकते. ढिगारे हटवल्यानंतर मृतदेह बाहेर काढले जातील. बचावकार्य वेगाने सुरू आहे. पण ते कधी थांबवायचे हेच कळत नाही, असे यूएनची मदत पाठवणाऱया युनिटचे प्रमुख मार्टिन ग्रिफित्स यांनी म्हटले आहे. याचदरम्यान सीरियामध्ये वेळेवर मदत पोहोचत नाही. भूकंपानंतर रस्त्यांवर साचलेले ढिगारे उपसण्याचे काम संथगतीने सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. मात्र, भूकंपाची व्याप्ती मोठी असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी सांगितले. जगभरातील बऱयाच देशांकडून मदत प्राप्त होत असून त्याचा पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.