दर महिन्याला 6 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश ः करवीर प्रांताधिकाऱयांचा महत्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी,कोल्हापूर
लक्षतीर्थ वसाहत येथील वृध्द आईला न सांभाळणाऱ्या मुलाला ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा करवीर प्रांताधिकाऱ्यांनी दणका दिला. आईला महिन्याला सहा हजार रुपये पोटगी व राहत्या घराच्या घरफाळ्यासह वीज, पाणी बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाने या वृध्द महिलेला न्याय मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद येथे पशुधन पर्यवेक्षक असलेल्या मुलालाही चांगला धडा मिळाला आहे.
या वृध्द महिलेने सद्या पशुधन पर्यवेक्षक म्हणून चांगल्या पगाराची नोकरी असलेल्या मुलाला अत्यंत गरीब परिस्थितीत काबाडकष्ट करुन वाढविले. परंतु वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आईच्या पालनपोषणाची जबाबदारी नाकारली. कुटूंबाला हातभार लागावा म्हणून आईने घेतलेले मिरची कांडप मशिनही काढून घेतले. नंतर हे मशिन आपल्या पत्नीला चालविण्यास दिले. याबाबत वेळोवेळी प्रतिष्ठीत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करुन समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. अखेर या वृध्द आईने ज्येष्ठ नागरिक व आई वडील चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 व नियम 2010 अन्वये करवीर प्रांताधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे अध्यक्षांकडे तक्रार अर्जाद्वारे दाद मागितली.


याबाबत करवीर प्रांताधिकाऱयांकडे नुकतीच सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यानंतर आईच्या पालनपोषणाची जबाबदारी झटकणाऱया मुलाच्या डोळ्यात अंजन घालणारा महत्वपूर्ण निर्णय झाला. यामध्ये जि. प. मध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून नोकरीला असणाऱया मुलाचे दरमहा वेतन व इतर उत्पन्नाचा विचार करुन दरमहा 10 तारखेपर्यंत सहा हजार रुपये पोटगी व राहत्या घराच्या घरफाळ्यासह वीज, पाणी बिल भरण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या प्रति जिल्हाधिकाऱयांसह पोलीस अधीक्षक, समाज कल्याण अधिकारी, करवीर दुय्यम निबंधक, करवीर पोलीस निरिक्षक आदींनाही पाठविण्यात आल्या. या निर्णयामुळे आईवडीलांना न सांभाळणाऱया मुलांना धडा मिळाला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.