Tarun Bharat

सख्ख्या भावानेच केला लहान भावाचा खून

बेकवाड येथील शिवारातील घटनेने खळबळ : शेतजमिनीवरून दोघा भावांमध्ये होते वाद

वार्ताहर / नंदगड

खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकवाड गावाजवळ बाळेकोड शिवारात शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच लहान भावाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मोठा भाऊ जकाप्पा गुरव याने आपला लहान भाऊ यल्लाप्पा शांताराम गुरव (वय 35) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे.

सदर घटना बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. घटनास्थळी डीवायएसपी रवि नाईक, खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी भेट दिली आहे. या खुनात आणखी कुणाचा सहभाग आहे का, असा संशय असून याचा तपास नंदगड पोलीस करत आहेत.

बेकवाड येथील शांताराम गुरव कुटुंबीय हे गेल्या 20 वर्षांपासून बिडी येथे स्थायिक झाले होते. शांताराम गुरव यांची बेकवाडजवळील बाळेकोड येथे शेतजमीन आहे. शांताराम यांना यल्लाप्पा व जकाप्पा अशी दोन मुले आहेत. या दोघा भावांमध्ये शेतजमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद होते. शेताच्या वाटणीवरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. बुधवारी सायंकाळी यल्लाप्पा हा शेतावर गेला होता. यावेळी यल्लाप्पा व जकाप्पा यांच्यात जोरदार भांडणे झाली. जकाप्पाने यल्लाप्पाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार केल्याने यल्लाप्पाचा शेतातील घरासमोरच मृत्यू झाला. मात्र याबाबतची माहिती कोणालाही समजली नव्हती.

सकाळी आसपासचे शेतकरी शेताकडे गेल्यावर सदर घटना उघडकीस आली. याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सपाटे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यानंतर सदर घटना वरिष्ठांना कळविण्यात आली. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी रवि नाईक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आसपासच्या परिसरात पाहणी केली व संबंधितांना काही सूचना केल्या. यानंतर मृतदेह बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. गुऊवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. बैलहोंगलचे डीवायएसपी रवि नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा तपास करण्यात येत आहे. जखमी अवस्थेतील जकाप्पाची रुग्णालयात जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे.

धारदार शस्त्र डोळ्यात भोसकले…

दोघा भावांमध्ये झालेल्या हाणामारीत जकाप्पा हा गंभीर जखमी झाला असून बेळगाव येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नंदगड परिसरात जमिनीच्या वादातून खुनाची ही पहिलीच घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून करताना आणखी कोणी सामील आहे का? याचा पोलीस कसून तपास करीत आहेत. खून झालेल्या ठिकाणाहून पोलिसांनी तलवार व इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच मृतदेहाच्या शेजारी मिरचीपूड पडलेली होती. तसेच डोळ्यात तिखट घालून धारदार शस्त्र डोळ्यात भोसकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

व्हॅक्सिनडेपोची स्थगिती उठविताना केवळ मॉडिफिकेशन

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानतर्फे अनगोळमधील किल्ला प्रतिकृतांची पाहणी

Amit Kulkarni

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळय़ात

Patil_p

टूलकिट प्रकरण : महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना पाठविली नोटीस

Archana Banage

रेल्वेस्टेशन रोडवरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Patil_p

बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना डोकेदुखीचीच

Amit Kulkarni