Tarun Bharat

युध्दाचा भडका

मारियुपोल थिएटरवरील हल्ल्यात 600 ठार

बळींचा आकडा आला समोर : रशियाने केला होता हल्ला

रशियाच्या सैन्याने मागील महिन्यात मारियुपोल थिएटरवर क्षेपणास्त्र हल्ला केला हाहेता. एसोसिएटेड प्रेसच्या एका अहवालानुसार या हल्ल्यात आता 600 हून अधिक लोक मारले गेल्याचे पुरावे समोर आले आहेत. व्यक्त करण्यात आलेल्या अनुमानापेक्षाही रशियाच्या हल्ला भयानक होता असे एपीने बचावपथकाचा दाखला देत म्हटले आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी स्कँडेनेवियन देश डेन्मार्कच्या स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक संदेश जारी केला आहे. रशिया युद्ध रोखण्यास तयार नाही. रशिया युक्रेन आणि अन्य युरोपीय देशांना गिळपृंत करण्याचे स्वप्न पाहत असला तरीही ते साकार होणार नाही. 77 वर्षांपूर्वी जे घडले होते, त्याचप्रमाणे शांततेचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याचे झेलेंस्की यांनी या संदेशात म्हटले आहे.

अन्य युरोपीय देश देखील रशियाच्या सैन्याच्या हल्ल्याच्या तावडीत सापडू शकतात. युक्रेनमध्ये युरोप खंडाचे भविष्य निश्चित झाले आहे. केवळ आमच्याकडे नव्हे तर आमच्या शेजारी देशांमध्येही शांतता प्रस्थापित होणर आहे. हे युद्ध आणखीन किती दिवस चालणार हे कुणीच सांगू शकत नाही. परंतु आमच्या स्वातंत्र्याचा दिवस नजीक आला असल्याचे भरवसा असल्याचे झेलेंस्की म्हणाले.

युक्रेनच्या डोनेट्स्क येथे रशियाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात 10 जणांना जीव गमवावा लागला तर 20 जण जखमी झाले आहेत. खारकीव्ह येथे बुधवारी रशियाच्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. युद्धाच्या स्थितीत नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट युक्रेनला अवजड शस्त्रसामग्री पाठविण्याचा विचार करत आहेत. ब्राझीलचे माजी अध्यक्ष लुला यांनी ब्लादिमीर पुतीन यांच्यासह झेलेंस्की यांनाही युद्धासाठी दोषी ठरविले आहे.

पुतीन यांचे दबावतंत्र

रशियाचे चलन रुबलमध्ये पेमेंट करण्याची मागणी अनेक देशांनी मान्य केली आहे. यामुळे हळूहळू युरोपचे काही देश हे ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झुकण्यास तयार झाल्याचे संकेत मिळत आहेत. पुतीन हे गॅस आणि कच्च्या तेलाच्या बळावर युरोपीय देशांवरील दबाव आणखीन वाढविणार असल्याचे मानले जात आहे.

मोल्दोवा अडचणीत

रशियाने मोल्दोवावर हल्ला करण्याची तयारी चालविली असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मोल्दोवाच्या ट्रान्सनिस्ट्रिया भागात दोन बॉम्बस्फोट झाल्यावर युक्रेनने हा दावा केला आहे. ट्रान्सनिस्ट्रिया हा मोल्दावामधील एक छोटा भूभाग असला तरीही तेथे रशियाचे समर्थनप्राप्त प्रशासनाचे नियंत्रण आहे.

रशियाचे क्षेपणास्त्र नष्ट

युक्रेनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने कीव्हमध्ये रशियाचे क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट केले. या क्षेपणास्त्राचे तुकडे नजीकच्या गावांमधून हस्तगत करण्यात आले आहेत. या हल्ल्यात कुठलीच जीवितहानी झालेली नाही असे महापौरांनी सांगितले आहे. तर रशियाकडून सेंट्रल डीनिप्रो येथे करण्यात आलेल्या हल्ल्यात रेल्वे सुविधांचे नुकसान झले आहे.

रशियाचा सर्वात घातक टी-90एम रणगाडा उद्ध्वस्त

युक्रेनमध्ये रशियाला मोठा झटका : भारताचे वाढणार टेन्शन

युक्रेनच्या युद्धात आतापर्यंत शेकडो रणगाडे आणि चिलखती वाहने गमाविलेलया  रशियाला आता मोठा झटका बसला आहे. युक्रेनच्या सैनिकांनी पहिल्यांदाच रशियाचा सर्वात आधुनिक म्हणवून घेणारा टी-90एम रणगाडा नष्ट केला आहे. मोस्कोवा युद्धनौका बुडाल्यावर हा रशियासाठी दुसरा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

रशियाचा हा रणगाडा अत्याधुनिक असून त्याचे मुख्य अस्त्र मानला जातो. रशियन टी-90 रणगाडा नष्ट होणे भारतासाठी देखील मोठय़ा चिंतेचे कारण आहे, कारण हेच रणगाडे सैन्य देखील वापरत आहे.

शत्रूच्या एखाद्या रणगाडय़ाने हल्ला केला तरीही स्वतःचा बचाव करता येई अशाप्रकारे रशियाच्या टी-90 रणगाडय़ाची निर्मिती करण्यात आली आहे. यातील स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा क्षेपणास्त्र हल्ल्याच्या स्थितीत स्मोक ग्रेनेडचा वापर करते. युक्रेनच्या सैन्याने एक ड्रोन फुटेज जारी करत रशियाच्या 38 कोटी रुपयांच्या रणगाडय़ाला कशाप्रकारे नष्ट केले हे दाखवून दिले आहे. याचबरोबर युक्रेनने रशियाची थर्मोबेरिक रॉकेट सिस्टीमही उद्ध्वस्त केली आहे.

कीव्ह इंडिपेंडेंट या वृत्तपत्राचे पत्रकार इलिया यांनी एक छायाचित्र शेअर केले असून यात रशियाच्या टी-90 रणगाडय़ाचे अवशेष दिसून येत आहेत. युक्रेनच्या ओब्लास्ट भागात या रणगाडय़ावर थेट हल्ला करण्यात आला होता. रशियाच्या शस्त्रताफ्यातील या सर्वात घातक रणगाडय़ाला नष्ट केल्याने युक्रेनच्या सैन्याचे मनोबल वाढले आहे. रशियाच्या सैन्यात सध्या अशाप्रकारचे केवळ 100 रणगाडेच वापरात आहेत.

रशियाने स्वतःच्या स्वयंचलित टी-14 अर्माटा रणगाडय़ाला अद्याप सैन्यात सामील केलेले नाही. टी-90 रणगाडय़ाच्या टी-90एस या आवृत्तीची रशियाने अनेक देशांना निर्यात केली आहे. भारतीय सैन्यात देखील हजारोंच्या संख्येत टी-90 भीष्म रणगाडे आहेत. रशियाच्या या रणगाडय़ाच्या डिझाइनमध्ये त्रुटी असल्याने हल्ल्याच्या स्थितीत यात ठेवण्यात आलेल्या दारूगोळय़ाचा स्फोट होत असल्याचे पाश्चिमात्य तज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या मदतीमुळेच रशियाचे जनरल्स ठार

गुप्तचर माहितीची युक्रेनला मोठी मदत

रशियाविरोधी युद्धात युक्रेनला अमेरिका, ब्रिटनसह अनेक देश विविध प्रकारे मदत करत आहेत. यादरम्यान अमेरिका रशियाच्या सैन्याच्या हालचालींसंबंधी युक्रेनला गोपनीय माहिती पुरवत आहे. या माहितीमुळे रशियाच्या सैन्याधिकाऱयांना लक्ष्य करत त्यांना ठार करण्यास युक्रेनला मदत होत असल्याचा दावा अमेरिकेच्या एका अधिकाऱयाने केला आहे.

रशियाच्या सुमारे 12 प्रंटलाइन जनरल्सना युद्धात ठार केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या या दाव्यावर सैन्य विश्लेषक देखील चकित झाले आहेत. बिडेन प्रशासन युद्धादरम्यान प्रत्यक्षवेळेतील गुप्तचर माहिती युक्रेनला पुरवत आहे. या माहितीमुळे युक्रेनच्या सैन्याला युद्धाचे डावपेच आखण्यास मदत होत आहे.

अमेरिकेने अलिकडेच डोनबास क्षेत्रातील रशियाच्या युद्ध योजनेसंबंधी युक्रेनला माहिती पुरविली होती. रशियाच्या सैन्याच्या मोबाइल हेडक्वार्टरचा ठावठिकाणा आणि अन्य माहिती पुरविण्यावर अमेरिकेचा भर आहे. युक्रेनचे अधिकारी अमेरिकेकडून मिळत असलेल्या माहितीचा वापर करत रशियाच्या सैन्याधिकाऱयांना लक्ष्य करत आहेत. अमेरिकेकडून मिळालेले लोकेशन विचारात घेत युक्रेनच्या सैन्याकडून तोफांचा मारा करण्यात आला, अशाप्रकारच्या हल्ल्यात रशियाचे अनेक जनरल्स मारले गेले आहेत.

अमेरिका युद्धाच्या प्रारंभापासून युक्रेनला मदत करत आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला मदतीदाखल शस्त्रास्त्रs आणि निधी देण्याची घोषणा केली होती. याचबरोबर अमेरिकेने रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. गुप्तर माहिती पुरविणे देखील याच मदतीचा हिस्सा आहे. रशियाच्या सैन्याच्या हालचाली जाणून घेण्यासाठी अमेरिकेने अनेक स्रोतांचा वापर चालविला आहे.

आण्विक क्षेपणास्त्र डागण्याचा रशियाकडून सराव

युक्रेनवरील आण्विक हल्ल्याचा वाढला धोका

मागील 70 दिवसांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धात आण्विक हल्ल्याचा धोका वाढत आहे. रशियाच्या सैन्याने आण्विक क्षेपणास्त्रs डागण्याचा सराव केला आहे. सिम्युलेटरवर आधारित आण्विक क्षेपणास्त्रांचा हा सराव रशियाच्या कॅलिनिनग्रामध्ये करण्यात आला. रशियाच्या सैन्याने एकाहून अधिक हल्ल्यांचा सराव केला आहे.

रशियाने युद्धादरम्यान अनेकवेळा अप्रत्यक्ष स्वरुपात आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. युरोपीय महासंघाचे सदस्य असलेल्या पोलंड आणि लिथुआनिया यांच्यामधील बाल्टिक समुद्रातील रशियन सैन्याच्या तळावर आयोजित युद्धाभ्यासादरम्यान आण्विक हल्ल्यास सक्षम इस्कंदर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणलीच्या इलेक्टॉनिक लाँचचा सराव करण्यात आला. या सरावात अनेक क्षेपणास्त्रs डागण्यात आली आणि यावर होणाऱया प्रत्युत्तरापासून वाचण्याच्या उपायांचेही परीक्षण करण्यात आले. आण्विक सरावात हल्ल्यामुळे फैलावणारा किरणोत्सर्गी आणि रासायनिक प्रभावाचेही आकलन करण्यात आले. या सरावात 100 हून अधिक रशियन सैनिक आणि अधिकारी सामील झाले.

युक्रेनियन पुरुष अन् मुलांचेही लैंगिक शोषण

युक्रेनमध्ये रशियाच्या सैनिकांकडून लैंगिक शोषण करण्यात येत असल्याच्या तक्रारी दीर्घकाळापासून येत आहेत. परंतु आता लैंगिक शोषणाला केवळ महिला नव्हे तर पुरुष आणि मुले देखील बळी पडल्याचे समोर आले आहे. अशा अनेक प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघ आणि युक्रेनच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.

युक्रेनमध्ये पुरुष आणि मुलांचेही लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या असल्या तरीही अद्याप याची पडताळणी करण्यात आली नसल्याची मातिही संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष प्रतिनिधी प्रमिला पॅटन यांनी दिली आहे.

बलात्कार पीडितांसाठी गुन्हय़ाची तक्रार करणे आणखीनच अवघड ठरू शकते.  सर्व पीडितांना लैंगिक शोषणाप्रकरणी तक्रार करता यावी यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे लागणार आहे. अनेक प्रकरणांची नोंद झाली असली तरीही प्रत्यक्षात त्यांची संख्या याहून अधिक असल्याचे त्या म्हणाल्या.

रशियाच्या सैनिकांनी मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयाचे पुरुष आणि महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. रशियाने नागरिक समाजाला भयभीत करण्यासाठी जाणूनबुजून रणनीतिच्या स्वरुपात लैंगिक शोषणाचा वापर केला असल्याचा आरोप युक्रेनच्या सॉलिसिटर जनरल इरीना वेनेडित्कोव्हा यांनी केला आहे.

Related Stories

चीनच्या अर्थव्यवस्था होतेय कमजोर

Patil_p

आगामी काळ खडतर : बायडेन

Omkar B

क्वाड देशांच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक लवकरच

Patil_p

चीनमध्ये तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही

datta jadhav

डास पाळणारी प्रयोगशाळा

Patil_p

नेपाळच्या सात जिल्ह्यात चीनचे अतिक्रमण

datta jadhav