रशियाकडून युक्रेनची विमानविरोधी यंत्रणा उध्वस्त : युरोपियन देशांकडून मिळाली होती ही एस-300 यंत्रणा
कीव्ह / वृत्तसंस्था
गेला दीड महिना होत असलेल्या युक्रेन-रशिया युद्धात सोमवारी युक्रेनची मोठी हानी झाली आहे. युरोपियन देशांनी युक्रेनला पुरविलेली एस-300 ही अभेद्य मानली जाणारी विमानविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा रशियाने उध्वस्त केली. त्यामुळे रशियाच्या युद्ध विमानांना युक्रेनकडून मिळणाऱया आव्हानात आता मोठीच अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे युद्धतज्ञांचे मत आहे.
ही क्षेपणास्त्र यंत्रणा डीनिप्रो या युक्रेनमधील शहरात एका बंकरमध्ये दडविण्यात आली होती. योग्यवेळी तिचा उपयोग केला जाणार होता. तथापि, रशियाला याचा सुगावा लागल्याने रशियन सेनेने या बंकरवरच हल्ला केला. त्यामुळे बंकर आणि त्याचे तळघर उध्वस्त झाले. ही यंत्रणाही यात नाश पावली असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा युक्रेनला मोठाच फटका असून त्याची जबर हानी झाली आहे.
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह


या बंकरच्या संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले 25 सैनिकही रशियाच्या या मोठय़ा हल्ल्यात जखमी झाले आहेत. ही यंत्रणा कोणत्या युरोपियन देशाने युक्रेनला दिली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही यंत्रणा अशा प्रकारे नष्ट झाल्याने या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्न निर्माण झाला आहे.
अध्यक्षांचा देशवासियांना इशारा
युक्रेन-रशिया युद्धात आगामी दोन-तीन आठवडय़ांचा कालावधी निर्णायक ठरु शकतो, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या देशबांधवांना दिला आहे. रशियाने मोठे सैन्य पूर्व युक्रेनच्या आसपास नियुक्त केले असून ते वेगवान हालचाली करण्याची शक्यता आहे. या सैन्याकडून मोठा हिंसाचार होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी रविवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केले. रशिया युद्धगुन्हय़ांची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नव्या कमांडरची नियुक्ती
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन आघाडीवर नव्या कमांडरची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. अलेक्झांडर डीव्हॉरनिकोव्ह असे या कमांडरचे नाव आहे. या कमांडरने सिरीयामध्ये मोठा हिंसाचार केला होता, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आता युपेनमध्ये मोठय़ा प्रमाणात रशियन सैनिक हिंसाचार आणि अत्याचार करतील अशी शक्यता अमेरिकेने बोलून दाखवली. युक्रेनच्या नागरीकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
रशियाची आगेकूच, पण…
रशियाने युक्रेनमध्ये आणखी काही भाग आपल्या ताब्यात घेत आगेकूच चालविली आहे. तथापि युक्रेननेही आपल्या तुटपुंज्या साधनसामग्रीच्या साहाय्याने रशियाला जोरदार प्रत्युत्तरही दिला आहे. त्यामुळे झटपट लष्करी कारवाई करता येईल ही रशियाची अपेक्षा फोल ठरली आहे. प्रत्येक इंच जिंकण्यासाठी रशियाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असून उपयोगात आणलेल्या बळाच्या तुलनेत फारसे यश अद्यापपावेतो पदरी पडलेले नाही, असे रशियातही बोलले जात आहे. त्यामुण्s रशियाची शस्त्रे आणि सैनिक यांच्या मारक क्षमतेवर शंका निर्माण झाली असून हे युद्ध कितीकाळ चालणार याविषयी अधिकच दाट संभ्रम आहे.
बुचा हत्याकांडाचे सूत्रधार युद्धगुन्हय़ाचे दोषी


गेल्या आठवडय़ात युक्रेनच्या बुचा येथे झालेल्या निरपराध्यांच्या हत्याकांडाचे सूत्रधार हे युद्धगुन्हय़ांचे दोषी आहेत, असे प्रतिपादन जर्मनीचे ओलॉफ शुल्झ यांनी केले आहे. या सर्व गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली. बुचा येथे रशियन सैनिकांनी युक्रेनच्या नागरीकांवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या अत्याचारांमधून बालकांचीही सुटका झाली नव्हती.
बुचा येथील नरसंहार विसरला जाऊ शकत नाही. हे गुन्हे आम्हाला स्वीकारार्ह नाहीत. सभ्य जगात अशा गुन्हय़ांना स्थान नाही. रशियाला याची किंमत मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया युरोपातील इतर अनेक देशांच्या प्रमुखांनीही व्यक्त केली आहे. मात्र, नेमकी कोणती कृती करणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
बुचामधून सैन्य माघार
बुचामधून रशियने सैन्याने माघार घेतली आहे. मात्र त्यांच्या माघारीनंतर तेथील नरसंहार स्पष्ट झाला. रशियन सैनिकांनी शेकडो निरपराध नागरीकांच्या हत्या केल्याचे आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केल्याचे दिसून आले. या ठिकाणी सामुहिक दफन करण्यात आल्याचेही समजले. बालके आणि स्त्रियांवर मानवतेला लाजवणारे अत्याचार करण्यात आले आहेत. असा आरोप युरोपियन देशांनी केला.
नागरीकांचे स्थलांतर सुरुच


युद्धाला आता 45 दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी अद्यापही नागरीकांचे स्थलांतर युक्रेनमधून सुरुच आहे. गेल्या शुक्रवारपर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांनी स्थलांतर केले असून ते शेजारच्या हंगेरी आणि पोलंड या राष्ट्रांमध्ये पोहचले आहेत. झेकोस्लोव्हाकियानेही काही लोकांना आश्रय दिला आहे.
मात्र हे स्थलांतर सुखावह झालेले नाही, असेही वृत्त आहे. अनेक नागरीकांना स्थलांतर करता आलेले नाही. त्यांचा जीव धोक्यात आहे. तसेच स्थलांतर करीत असताना अनेक नागरीकांचा बळी गेला. रशियन सैनिकांनी त्यांना टिपले, असा आरोप केला जात आहे. पूर्व युक्रेनमधील गाव क्रामाटोरस्क येथे गेल्या सोमवारी रशियाचे क्षेपणास्त्र आदळले होते. त्या हल्ल्यात 50 हून अधिक नागरीक बळी पडले. रेल्वे स्थानकावर हे क्षेपणास्त्र पडले होते. ते रशियाने या स्थानी हेतुपुरस्सर सोडले होते असा आरोप युक्रेनने केला होता. मात्र रशियाने त्याचा इन्कार केला.
भयानक वातावरण
युक्रेनच्या ज्या भागांमधून रशियन सैनिकांनी माघार घेतली आहे, तेथील दृष्ये भयानक आहेत, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या भागांमध्ये रस्तोरस्ती नागरीकांची अर्धवट जळलेल्या अवस्थेतील पेते पडली आहेत. त्यात बालके आणि महिलांचे प्रमाण मोठे आहे. मृत्यूपूर्वी त्यांना यातना देण्यात आल्या असाव्यात असे अनेकांचे म्हणणे आहे. या सर्व गावांमध्ये भग्न इमारती, रस्त्यांवरचे मृतदेह, जळलेल्या मांसाचा दुर्गंध असे भीतीदायक वातावरण आहे. कित्येक रस्त्यांवर तर पाऊल ठेवता येणे अशक्य आहे, असे वर्णन सोशल मिडियावर येत आहे.
युक्रेन नागरीकांचा तीव्र प्रतिकार


युरोपियन आणि अमेरिकन वर्तमानपत्रांमध्ये युपेनच्या नागरीकांच्या कडव्या प्रतिकाराचे कौतुक करण्यात आले आहे. कठीण परिस्थितीत आणि अपुऱया साधनसामग्रीनिशी हे नागरीक आपला देश, स्वाभिमान आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. एका महासत्तेशी आपला संघर्ष आहे, याची जाणीव त्यांना आहे. मात्र तरीही ते नेटाने झुंजत आहेत, असे दिसून येते.
काही अमेरिकन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी युक्रेनचा दौरा केला तेव्हा त्यांना युक्रेनच्या नागरीकांचा या निर्धाराचा परिचय झाला. या नागरीकांपाशी शस्त्रे आहेत. मात्र, ती रशियाच्या तोडीची नाहीत. तसेच अनेक नागरीकांना शस्त्रे चालविण्याचा फारसा सरावही नाही. तरीही ते युद्धासाठी रणमैदानात उतरले आहेत. रशियन सैन्यासमोर माघार घ्यायची नाही. शरणागती तर दूरची बाब, असे त्यांचे म्हणणे आहे. या त्यांच्या तिखट प्रतिकारामुळेच शस्त्रबळाचे भांडार असलेल्या रशियन सेनेला आपला वेग अपेक्षितरित्या ठेवता आलेला नाही. प्रत्येक शहरात आणि लहान गावांमधूनही स्थानिक नागरीकांनी आपल्या सेना उभ्या केल्या आहेत, असे युक्रेनमधील चित्र असल्याचे या पत्रकारांनी नमूद केले आहे.
युद्धगुन्हय़ांच्या तपासासाठी फ्रान्सचे दल युक्रेनमध्ये


रशियन सैनिकांनी केलेल्या नरसंहाराची आणि युद्ध गुन्हय़ांची चौकशी करण्यासाठी फ्रान्स सरकारचे एक दल युक्रेनमध्ये आले आहे. या दलामध्ये युद्ध गुन्हय़ांच्या तज्ञांचा समावेश आहे. या दलाने बुचा येथे अनेक स्थानांची पाहणी केली. तेथील परिस्थितीचे त्यानी चित्रण करुन घेतले. याच पुराव्यांच्या आधारे युद्ध गुन्हय़ांची चौकशी केली जाणार आहे. असे स्पष्ट करण्यात आले.
फ्रान्सच्या संरक्षण, गृह आणि न्याय विभागाने या दलासंबंधी एक निवेदन प्रसिद्धीस दिले होते. त्यानुसार या दलात 15 जणांचा समावेश आहे. त्यात 12 जण युद्धस्थळ तज्ञ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सैनिकांनी पेलेल्या अत्याचारांचे पुरावे हे दल गोळा करणार असून नंतर त्यांचा उपयोग आंतरराष्ट्रीय न्यायालयात युद्ध गुन्हे सिद्ध करण्यासाठी केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
रशियाकडून इन्कार
रशियाने मात्र सैनिकांनी गुन्हे केल्याचा इन्कार केला आहे. नागरीकांचा मृत्यू सैनिकांच्या हेतुपुरस्सर हल्ल्यामुळे झालेला नाही. ही एक अपरिहार्यता होती. अनेक नागरीक परस्परांमधील संघर्षात मृत्युमुखी पडल्याचेही रशियाचे म्हणणे आहे. या दलात स्फोटक आणि क्षेपणास्त्र तज्ञांचाही समावेश आहे.
फ्रान्स युक्रेनच्या पाठीशी
या कठीण परिस्थितीत फ्रान्स युक्रेनच्या पाठीशी पूर्ण सामर्थ्यानिशी उभा आहे. युपेनला आवश्यक ते सर्व साहाय्य केले जाईल. फ्रान्स यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असेही फ्रान्स सरकारने स्पष्ट केले. इतर आंतरराष्ट्रीय संस्थाही युक्रेनला साहाय्य करण्यास पुढे आल्या असून यात आंतरराष्ट्रीय गुन्हा न्यायालयही आहे.