इंडिगोच्या फ्लाइटला विलंबाचे कारण : व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल मीडियावर सोमवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंडिगोच्या फ्लाइटमधील ही घटना असून ती रविवारी घडल्याचे समोर आले आहे. फ्लाइटला विलंब होणार असल्याची घोषणा वैमानिक करत असताना एका प्रवाशाने त्याला थप्पड लगावल्याचे या व्हिडिओत दिसून येते. ही फ्लाइट दिल्लीहून गोव्यासाठी रवाना होणार होती. परंतु दाट धुक्यामुळे उ•ाणाला विलंब झाला होता. या विलंबामुळे वैतागलेल्या प्रवाशाने ही मारहाण केली आहे. या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित प्रवाशाच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फ्लाइटमध्ये वैमानिक आणि चालक दलाचे अन्य सदस्य उभे असताना आणि अनाउंसमेंट केली जात असताना पिवळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेला इसम वैमानिकावर हल्ला करत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. या घटनेनंतर विमानात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आरोपी प्रवाशाचे नाव साहिल कटारिया आहे. इंडिगोकडून त्याला नो फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. तर कटारियाने हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर घडलेल्या प्रकाराप्रकरणी माफी मागितली आहे.