छाननीत 14 अर्ज बाद, 5723 उमेदवार रिंगणात : आज अर्ज मागे घेण्याचा दिवस, 10 रोजी मतदान राज्यभरात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील 186 ग्रामपंचायतींसाठी होणाऱया निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 6256 अर्जांची मंगळवारी छाननी झाली त्यात 14 अर्ज बाद ठरले आणि 5723 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. आज बुधवारी अर्ज मागे घेण्यात येणार असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यातील 12 तालुक्यांमधील 186 ग्रामपंचायतींसाठी दि. 10 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी गत आठवडय़ात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली होती. त्यानुसार सहा दिवसांच्या कालावधित 6256 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली असता 14 अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे 5723 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
मात्र त्यातील बरेचजण आज बुधवारी अर्ज मागे घेऊन निवडणुकीतून माघार घेणार आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंत उमेदवारांची नक्की संख्या स्पष्ट होणार आहे.
सर्वाधिक 1142 अर्ज बार्देशात
एकूण आकडेवारीनुसार सर्वाधिक 1142 अर्ज बार्देश तालुक्यातून तर त्यापाठोपाठ 938 अर्ज सालसेत तालुक्यातून दाखल झाले आहेत. त्याशिवाय फोंडा, तिसवाडी या तालुक्यांमधून 600 पेक्षा जास्त तर पेडणे व डिचोली तालुक्यांमधून 400 पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत.
आज होणार चित्र स्पष्ट
अनेक पंचायतींमधून छाननीदिवशीच अनेक उमेदवार बिनविरोध विजयीही झाले असून त्या संबंधित उमेदवारांच्या प्रभागात निवडणूक होणार नाही हे निश्चित झाले आहे. त्यामुळे आज अर्ज मागे घेणाऱया उमेदवारांबरोबरच या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची संख्याही जोडली जाणार आहे. त्यावरून प्रत्यक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार तसेच प्रत्यक्ष निवडणुकीस सामोरे जाणारे प्रभाग यांची संख्या या दोन्हींचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी 10 ऑगस्टला सुट्टी
ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान 10 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्या दिवशी सरकारने भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना मतदान करता यावे म्हणून ती सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी संपुर्ण गोवा राज्यासाठी लागू असून त्याची अधिसूनचा सरकारतर्फे जारी करण्यात आली आहे.
तालुकानिहाय पात्र उमेदवार
- पेडणे – 489
- डिचोली – 452
- सत्तरी – 333
- बार्देश 1142
- तिसवाडी – 643
- फोंडा – 660
- धारबांदोडा – 143
- सांगे – 191
- सालसेत – 938
- मुरगांव – 248
- केपे – 283
- काणकोण – 201