जम्मू-काश्मीर पोलीस पदक मिळाले नाव : प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर प्रशासनाने जम्मू-काश्मीर पोलीस पदकांसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. प्रशासनाने शौर्य आणि सेवेसाठी प्रदान करण्यात येणाऱया या पदकांवरील शेख अब्दुल्लांचे चित्र हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर राष्ट्रीय प्रतीक चिन्ह ‘अशोक स्तंभ’ कोरले जाणार आहे. अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री होते.
पदकाच्या एका हिस्स्यावरून शेख अब्दुल्लांचे चित्र हटविण्यात आले आहे. पदकाच्या एका बाजूला आता राष्ट्रीय चिन्ह तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे चिन्ह राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे. जम्मू-काश्मीर पोलीस पदक योजनेच्या पॅरा 4 मध्ये दुरुस्ती करत नव्या तरतुदींच्या अंतर्गत शेर-ए-काश्मीर शेख मोहम्मद अब्दुल्लांचे चित्र हटविण्यात आले आहे.
पदकांवर अशोक स्तंभाचे चिन्ह कोरण्यासंबंधीचा आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. यापूर्वी प्रशासनाने ‘शेर ए काश्मीर पोलीस पदका’चे नाव बदलून जम्मू-काश्मीर पोलीस पदक केले होते. प्रशासनाच्या या निर्णयाला राजकारणाशीही जोडून पाहिले जात आहे.
‘शेर-ए-काश्मीर’ असे संबोधन शेख अब्दुल्लांना उद्देशून केले जात होते. त्यांचे समर्थक त्यांना याच नावाने हाक मारायचे. ‘शेर-ए-काश्मीर’ या नावाने काश्मीरमध्ये अनेक रुग्णालये, स्टेडियम, रस्ते आणि अनेक इमारती आहेत.
शेख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे आजोबा आणि फारुक अब्दुल्ला यांचे पिता होते. तसेच जम्मू-काश्मीरचे ते पहिले मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री झाल्यावर फारुख अब्दुल्ला यांनी वडिलांच्या स्मरणार्थ पोलिसांना देण्यात येणाऱया पदकांवर त्याचे चित्र जोडण्याचा निर्णय घेतला होता.
अब्दुल्ला कुटुंब जम्मू-काश्मीरच्या राजकारणात विशेषस्थानी आहे. शेख अब्दुल्ला यांचा जन्म 5 डिसेंबर 1905 रोजी झाला होता. तर 8 सप्टेंबर 1982 रोजी त्यांचे निधन झाले होते. अब्दुल्लांना 1988 मध्ये मरणोत्तर साहित्य अकॅडमी पुरस्काराने (उर्दू) गौरविण्यात आले होते. ‘आतिशे चिनार’ या त्यांच्या आत्मकथेसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता.