वार्ताहर/ भुईंज
महामार्गावर उडतारे नजीक भुईंज पोलीस गाडीला अज्ञात ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कर्तव्य बजावणारे पोलीस बचावले पण गाडीखाली सापडून रस्त्यावर काम करणारे तीन कामगार जखमी झाले. पोलीस गाडीला ठोकर दिलेल्या अज्ञात ट्रकचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे बेंगलोर महामार्गावर उडतारे गावानजीक सातारच्या दिशेने महामार्गावर डिव्हाडरची दुरूस्ती करणाऱया कामगारांना सुरक्षा देत कर्तव्य बजावताना उभ्या असलेल्या भुईंजच्या पोलीस गाडीला पाठीमागून येणाऱया अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने सदर पोलीस गाडी डिव्हाडरवर पलटी झाली. यावेळी तेथे काम करणारे तीन कामगार गाडी खाली सापडले. प्रसंगवधान राखत भुईंज पोलीस गाडीत असलेले पोलीस हवालदार दत्तात्रय धायगुड़े, हवालदार शिवाजी तोडरमल आणि चालक संजय वाघ यांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना बाहेर काढले. तसेच उपचारासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. जखमीमध्ये धनसिंग लालू राठोड (वय 45 रा. उडतारे), विजू भिमू पवार (वय 50 रा. उडतारे), दत्तात्रय बाबुराव मुळे (वय 55 रा. उडतारे) यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत पंडीत यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवले.
दरम्यान, पोलीस गाडीला ठोकर देऊन पळून जाणाऱया ट्रकचा रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. वरील घटनेची नोंद भुईंज पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांची टीम करीत आहे.
दैव बलवत्तर म्हणूनच वाचले
भुईंज पोलीस स्टेशनचे हवालदार दत्तात्रय धायगुडे व चालक संजय वाघ हे महामार्गावर कामगारांना सुरक्षेबाबत सूचना देताना ते गाडी बाहेर होते. त्यामुळे ते या अपघातातून सुदैवाने वाचले.
पोलीस झाले भावनाविवश
सर्व जखमींना भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर जखमीमध्ये मदतकार्य करणारे पोलीस हवालदार धायगुडे व चालक वाघ यांची चौकशी करताना सपोनि आशिष कांबळे, पी. एस. आय. निवास मोरे, पी. एस. आय. रत्नदीप भंडारे सर्वच अधिकारी व पोलीस कर्मचारी हे भावनाविवश झाले होते. तसेच अपघातात नुकसानग्रस्त झालेली पोलीस गाडी एकच महिन्यापुर्वी भुईंज पोलीस ताफ्यात आली होती. तिच्याकडे पाहताना अधिकाऱयांना डोळयातील पाणी लपवता आले नाही.