Tarun Bharat

जिल्हय़ाच्या राजकारणाची होणार खिचडी


आता रणांगण जिल्हा परिषद आणि महापालिका : चौरंगी लढतीचे संकेत

Advertisements

कोल्हापूर / संतोष पाटील

महाविकास आघाडीच्या निमित्ताने जिह्यात भाजप विरुध्द काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष अशी राजकारणाची पक्षीय विभागणी झाली. आतापर्यंतच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटणारे नेते एकाच व्यासपीठावर दिसले. राज्यातील खांदेपालटानंतर येऊ घातलेली महापालिका निवडणूक चौरंगी होण्याचे संकेत आहेत. निवडणुकीनंतरच महाविकास आघाडी सभागृहात अस्तित्वात येईल. दरम्यान, राजकारणाची हवा बदलत राहणार आहे. सरमिसळ आणि वेगळेपण यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाची खिचडी होईल. गेल्या काही वर्षातील यश हे सूज किंवा फुगवटा नसून शतप्रतिशत पक्षीय ताकद होती, हे दाखवण्याचे मोठे आव्हान भाजप, शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसपुढे आहे. भविष्यात आघाडीच्या निमित्ताने तयार झालेली समिकरणे घडणार की बिघडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिवसैनिक भावनेच्या लाटेवर स्वार

कोल्हापूर शहर उत्तर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, राधानगरी भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा आदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव आहे. कोल्हापुरातील मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे मंत्री एकनाथ शिंदे गटात गेले. राज्यातील या बंडाळीनंतर जिह्यातील शिवसैनिक स्तब्ध आहे. जिल्हा परिषद, महापालिका, गोकुळ आणि जिल्हा बँकेत शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या साथीने सत्तेत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जिह्यात स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यास वाव आहे. महापालिका निवडणूक क्षेत्रात क्षीरसागरांची पोकळी भरुन काढावी लागेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर अन्याय झाल्याची भावना सामान्य शिवसैनिकांत आहे. शिवसेना सध्या तरी भावनिक लाटेवर स्वार असून येत्या निवडणुकीत ती कॅश करण्याचा प्रयत्न राहील.

भाजपचा प्रभाव वाढला

उत्तर विधानसभा निवडणुकीत महापालिकेच्या 20 प्रभागात भाजपचा प्रभाव दिसला. राज्यातील सत्तास्थापनेनंतर होणारी जिल्हा परिषद आणि महापालिकेची निवडणूक प्रामुख्याने भाजपची परीक्षा पाहणारी ठरेल. शिवसैनिकांच्या प्रखर नाराजीचा सामना करत भाजपला जिह्यात मुसंडी मारावी लागणार आहे. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची उघड तर कधी छुपी युती होईल. महाविकास आघाडीचा प्रयोग यापुढे झाल्यास भाजपला नाराजांची साथ मिळू शकते. शहर उत्तर, इचलकरंजी, शिरोळ, शाहूवाडी-पन्हाळा, कागल, कोल्हापूर दक्षिण, राधानगरी भुदरगड या मतदारसंघांत भाजप ताकद पणाला लावेल. सत्तास्थापनेनंतर वाढणारा राजकीय प्रभाव भाजपला स्थानिक निवडणुकीतही दाखवावा लागेल, हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नूतन खासदार धनंजय महाडिक यांच्यापुढील आव्हान असेल.

सतेज पाटील यांना प्रभाव राखावा लागेल

गेल्या तीन वर्षात जलद गतीने हालचाली करत स्वपक्षीय, मित्रपक्ष आणि विरोधकांवर जिह्याच्या राजकारणात मात देण्यात माजी पालकमंत्री सतेज पाटील यशस्वी ठरले. गोकुळ, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, शहर उत्तरमध्ये सतेज पाटील यांनी घातलेल्या जोडण्या फळाला आल्या. मंत्रिपद नसतानाही आपल्या मागील कार्यकर्त्यांचे जाळे भक्कमपणे त्यांना टिकवावे लागेल. जिह्यातील राजकारणात आपलाच प्रभाव आहे, हे दाखवण्याचे मोठे आव्हान सतेज पाटील पर्यायाने राष्ट्रीय काँग्रेसपुढे असेल. महापालिका निवडणूक ही सतेज पाटील यांचा करीष्मा अबाधित आहे का, यासाठी लिटमस टेस्ट ठरेल. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपतींसह काँग्रेस नेत्यांना एकीची मोट घट्ट ठेवून आव्हानात्मक वाटचाल करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा कस लागणार

कागल, राधानगरी भुदरगड, गडहिंग्लज चंदगड आजरा तालुक्यातच राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. हसन मुश्रीफ यांना त्यांच्या मतदारसंघात भाजपने कडवे आव्हान उभे केले आहे. तालुक्यातील लढाईत शिवसेना खासदार संजय मंडलिक यांची साथ मुश्रीफ यांच्यासाठी महत्वाची आहे. गोकुळ निवडणुकीतील वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव खासदार मंडलिक गट विसरलेला नाही. राधानगरी भुदरगडमध्ये के. पी पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यातील राजकीय वाद नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येईल. महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचा प्रभाव तोकडा आहे. राज्यातील सत्तेची सावली नसताना आपल्या बालेकिल्ल्यासह जिल्हाभर राष्ट्रवादीची ताकद अबाधित ठेवण्यात नेत्यांचा कस लागणार आहे.

तालुक्याच्या राजकारणातही त्रांगडे

महाविकास आघाडीच्या समिकरणामुळे प्रत्येक तालुक्यात राजकीय त्रिकोण अस्तित्वात आले आहेत. जनुसराज्यशक्तीचे नेते आमदार विनय कोरे आणि महादेवराव महाडिक भाजपमुळे एकाच व्यावसपीठावर आले. शाहूवाडी पन्हाळ्यात कमबॅकसाठी सत्यजित पाटील यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. करवीरमध्ये आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके गटातच निवडणुका होत असल्याने ‘महाविकास’चा प्रयोग ठरल्यास नरके भाजपची वाट भक्कम करतील. कागल तालुक्यात ’आमचं ठरलयं’चा नारा हसन मुश्रीफ आणि खासदार प्रा. मंडलिक यांना बांधून ठेवणार का, हे पहावे लागेल. राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांना अपक्ष निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे पाठबळ लाभले होते, बंडाळीनंतर राष्ट्रवादी विशेषतः मुश्रीफ आणि यड्रावकर यांच्यातील नातेसंबंध कायम राहणार काय, हे उत्सुकतेचे ठरेल. हातकणंगलेत आमदार राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर या लढतीत आता माजी आमदार राजीव आवळे हेही असतील. चंदगड तालुक्यात आमदार राजेश पाटील यांना शिवसेनेसह भाजपचा सामना करावा लागेल. इचलकरंजीत अपक्ष प्रकाश आवाडेंना भाजपने पाठबळ दिल्यास सुरेश हाळवणकर यांचे राजकीय पुर्नवसन कसे करणार, अशी राजकीय सरमिसळ आणि आखाडय़ांवरच राजकारण कुस बदलणार आहे.
पक्षीय धोरण असे असेल

भाजप : कमळ चिन्हाला प्राधान्य, पक्षीय युतीपेक्षा मात्तब्बर उमेदवारांवर लक्ष.
काँग्रेस : भाजप सोडून कोणाबरोबरही युती.
राष्ट्रवादी : स्थानिक पातळीवर आघाडीचा निर्णय.
शिवसेना : भाजपला रोखणे हाच उद्देश.
ताराराणी : भाजप कमी पडेल तिथे उमेदवार.
जनसुराज्यशक्ती : भाजपसोबत.
स्वाभिमानी : महाविकास आणि भाजपला योग्य अंतरावर ठेवण्याकडे कल.

अव्वल स्थान राखण्याचे आव्हान

तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या जोडण्या मागील सत्ताकाळात प्रत्येक निवडणुकीत फळाला आल्या. आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, महाडिक गटासह शिलेदारांची भाजपला मदत होईल. भाजप पर्यायाने चंद्रकांत पाटील हे भविष्यात मिळवणारे यश हे अपघाताने किंवा शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या इनकमिंग कार्यकर्त्यांवर मिळवलेले नाही, तर ते शतप्रतिशत भाजपचेच यश आहे. हे येत्या सर्व निवडणुकात दाखवण्याचे मोठे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष दादांच्या टीमपुढे असेल. चंद्रकांत पाटील यांना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेनेचा कडव्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. सत्तारोहणानंतर जिह्यात कमबॅक करताना चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेतृत्वाचा कस लागणार आहे.

Related Stories

Kolhapur; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकापक्ष स्वबळावर लढविणार : एकनाथराव पाटील

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन

Abhijeet Shinde

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सायंकाळी अंशतः पायी वाहतूक सुरू

Abhijeet Shinde

भाजपच्या ‘या’ नेत्याने हसन मुश्रीफांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद

Abhijeet Shinde

कोरोनामुळे नौका व्यवसायिक संकटात

Abhijeet Shinde

काँग्रेसतर्फे जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!