वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी/ काणकोण
वीजखाते यापुढे हरित उर्जेवर भर देणार असून गावागावात या उर्जेच्या त्याचप्रमाणे सौरऊर्जेच्या आधारावर वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या वर्षभरात काणकोण मतदारसंघातील सर्व भागांत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काणकोणच्या श्रीस्थळ येथील सरकारी विश्रामधामात आयोजित काणकोण मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना दिली.
सभापती रमेश तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, मतदारसंघातील गावडोंगरी पंचायतीचे सरपंच धिलोन देसाई वगळता अन्य सर्व पंचायतींचे सरपंच, पंच, नगरसेवक आणि वीज खात्याचे अधीक्षक अभियंता राजीव सामंत, कार्यकारी अभियंता शशिकांत हळदीकर, ग्रीडाचे संचालक कायतान डिकॉस्ता, गृहनिर्माण मंडळाचे विश्वास गावडे, काणकोणातील वीज खात्याचे साहाय्यक अभियंता संजय ना. गावकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
सर्व जुने वीजखांब हटविणार
यापुढे स्मार्ट मीटर ग्राहकांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज चोरीला आळा बसेल. या मतदारसंघातील सर्व जुने वीजखांब हटविण्यात येणार असून भूमिगत वीजवाहिन्या टाकल्यानंतर वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमी होतील, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले. पथदीपांची जबाबदारी आता वीज खात्याकडे असून स्थानिक पंच तसेच नगरसेवकांनी ज्या खांबांवरील पथदीप पेटत नाहीत त्यांचे सर्वेक्षण करून तो अहवाल वीज खात्याकडे सुपूर्द करावा. लगेच नवीन पथदीप बसविण्यात येतील. दिवाळीपूर्वी सर्व मतदारसंघातील पथदीप पेटतील याकडे खाते लक्ष देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
‘ग्रीडा’ योजनेखाली आमोणे येथे प्रकल्प
ग्रीडा योजनेखाली काणकोण मतदारसंघात आमोणे येथील बलराम निवासी शाळेजवळ पायलट प्रोजेक्ट हातात घेतला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या मतदारसंघातील नागरिकांनी सौरशक्ती, बायो गॅस त्याचप्रमाणे कुसुम पंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ढवळीकर यांनी यावेळी केले. कार्यकारी अभियंत्याला रु. 5 लाख, तर अधीक्षक अभियंत्याला 15 लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. पर्यटन खात्याने ज्या ज्या भागात हायमास्ट दिवे बसविले आहेत त्यांची जबाबदारी आता वीज खात्यावर आलेली आहे. त्यामुळे वीज खात्यामधील सर्व कर्मचाऱयांनी सतर्क राहून ग्राहकांना सेवा द्यायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
खोतीगाव पंचायतीमधील आवळी, कुसके, बड्डे, भूपर या ठिकाणच्या ‘दाण्यां’वर तसेच केरी डोंगरमाथ्यावर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई यांनी केली. तर किनारी भागांतील ट्रान्स्फॉर्मर्सवरील वीज कनेक्टर्सची दुरुस्ती करण्यात यावी, पाळोळे ते राजबागपर्यंतच्या रस्त्यावर पथदीप बसविण्यात यावेत, एलईडी दिव्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागण्या नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी केल्या. रस्त्याच्या बाजूला वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱया झाडांची छाटणी करण्यात यावी त्याचप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत, पथदीप दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर, लोलयेचे पंच अजय लोलयेकर, श्रीस्थळचे पंच राजेश वेळीप, आगोंदच्या उपसरपंच प्रीतल फर्नांडिस यानी केली.
वीजपुरवठय़ासाठी 200 कोटींची योजना ः तवडकर
काणकोण मतदारसंघातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आपण 200 कोटी रु. खर्चाचा आराखडा तयार केलेला आहे. पहिल्या टप्प्यात पैंगीण आणि लोलये पंचायतींमधील भूमिगत वीजवाहिन्यांसाठी 37 कोटी, तर आगोंद पंचायतीमधील भूमिगत वीजवाहिन्यांसाठी 67 कोटी रु. खर्चाला खात्याने मंजुरी दिल्याबद्दल सभापती रमेश तवडकर यांनी वीजमंत्री ढवळीकर यांचे यावेळी खास अभिनंदन केले आणि उर्वरित प्रकल्प देखील पूर्ण करण्याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली.
यावेळी काणकोण भाजप मंडळाचे प्रमुख विशाल देसाई, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, नगरसेवक हेमंत गावकर, माजी नगरसेवक किशोर शेट, पंच महेश नाईक, प्रवीर भंडारी, गणेश गावकर, प्रभाकर गावकर, सम्राट भगत, भूषण प्रभुगावकर यांनी अनेक समस्या सादर केल्या. त्यांना उत्तर देताना काणकोणच्या वीज खात्याचे साहाय्यक अभियंता संजय गावकर, कनिष्ठ अभियंता च्यारी, अक्षय गावकर, हेमंत गावकर, आनंद कामत, नितीन नाईक यांनी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या कामांची यादी सादर केली. त्यापूर्वी सभापती रमेश तवडकर यांनी अधीक्षक अभियंता राजीव सांमत, कार्यकारी अभियंता शशिकांत हळदीकर, साहाय्यक अभियंता संजय ना. गावकर यांच्या उपस्थितीत आगोंद पंचायतीमधील दोन ट्रान्सफॉर्मर्सचे उद्घाटन केले.