ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी मोर्चैबांधणीला सुरूवात केली आहे. देशभरातील विरोधकांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यावरुन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा पवारावर निशाणा साधला. राष्ट्रपतीपदासाठी विशिष्ट उंची लागते, बौद्धिक पातळी लागते. पवारांकडे कोणती उंची आहे? हे त्यांनी सांगावे, असा सवाल करत सदावर्तेंनी पवारांवर टीकास्त्र डागले.
अकोल्यात पत्रकारांशी बोलताना सदावर्ते म्हणाले, मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते, आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते. मला वाटतं नाव वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आवश्यक असते. मला वाटतं शरद पवार यांचं नाव चर्चेतून वाजवलं जात आहे. राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार. ते वयोवृद्ध आहेत.त्यांच्याकडे कुठली उंची आहे, हे त्यांनीच सांगावे.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडी सरकार अन्यायी राज्य करत आहे. राज्यात महिला, कष्टकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या सरकारला मत का देऊ नये, हे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करणार आहे, असेही सदावर्ते म्हणाले.